वर्धा, ९ महिन्याचे बाळ घातक ठरू शकते काय ? हा प्रश्न कोणीही हसण्यावर नेईल. पण व्याघ्र कुटुंबातील बाळ असा पराक्रम करू शकते हे, आज पहाटे दिसून आले. सेलू तालुक्यातील हा प्रसंग. सायंकाळी ५ वाजता सेलू शहरातील खरेदी विक्री संघाच्या परिसरातील बिबटया पोहचला. त्याची गावभर बोन्ब झाली. गर्दी वाढली म्हणून गावकरी जमा होत गेले. वन अधिकारी पोहचले.

पकडायचे कसे, हा पेच पडला. शेवटी पीपल फॉर ऍनिमल्स या पशुप्रेमी संघटनेची आठवण शासनास झाली. जेव्हा या संस्थेस फोन गेला, तेव्हा नवीच समस्या आली. स्थानिक वन अधिकारी सहकार्यशील नाही. जर जिल्हा वन अधिकारी सांगतील तेव्हाच ठरवू, असे उत्तर आल्यावर जिल्हा वन अधिकारी हरवीर सिंग यांनी संस्थेस फोन करीत विनंती केली की कृपया मदत करा.

तेव्हाच या संस्थेचे कौस्तुभ गावंडे, शुभम बोबडे व अन्य असे पाच या रेसक्यू ऑपेरेशन साठी धावले.प्रत्यक्षात प्रसंग बाका होता. कारण पाहताक्षणी लक्षात आले की हा आजारी अवस्थेतील ९ महिन्याचा बिबट आहे. ती पण मादी. मग सोबत असलेल्या पशू वैद्यकाचा सल्ला घेतला. त्याने स्पष्ट केले की इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्यास ही मादी मरू शकते.

कारण ती फार अशक्त व अर्धमेल्या अवस्थेत आहे. म्हणून मग जाळे टाकून पकडण्याचा निर्णय झाला. जाळे फेकले. पण त्यातून निसटून ती मादी बाहेत पडली.मादी बिबट जगली व वाचली पाहिजे, ही सर्वांची भावना होती. पण ती चवताळून जाळी तोडत बाहेर पडली आणि तिने शुभम व कौस्तुभ या दोघावंर हल्ला केला. त्यांच्या मांड्या व अन्य भागावर चावा घेतला. कौस्तुभ हा तर बिबट्याच्या अंगावर ४० सेकंद पकडून राहला.

त्याचे दोन्ही हात व पाय जायबंदी झालेत. बिबट्यास सोडले असते तर आणखी जखमी झाले असते, असे तो सांगतो. शेवटी श्रम झाल्याने बिबट निपचित पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. वाचवून तिला जीवन देण्याचे प्रयत्न बिबट मादीने झुगारून दिले म्हणून ही तिची आत्महत्याच ठरली, अशी भावना पशुप्रेमी व्यक्त करीत आहे.

तर बिबट हल्ल्यात जखमी झालेल्या कौस्तुभ व शुभम यांना वर्धा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावे आहेत. त्यातून रक्त वाहले. पण उपचार झाल्याने ते सुखरूप आहेत. कौस्तुभ म्हणतो बिबट वाचविता आला नाही याचे शल्य राहणार.ते बचावले. सध्या रुग्णालयातच आहेत. हा असा जखमी होण्याचा पहिलाच प्रकार असल्याचे कौस्तुभ गावंडे सांगतात.

मृत बिबटचे आज शव विच्छेदन होणार आहे. पीपल फॉर ऍनिमल्सचे आशिष गोस्वामी म्हणतात की की पशु सेवा करतांना जखमी होण्याची बाब दुर्मिळच. पण ती घडली. आज पहाटे ३ वाजता हे सोपास्कार आटोपले. बिबट वाचली नाही, हे शल्य तसेच आमचे दोन सहकारी जखमी हे दुःख पण आहेच.