वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. यापूर्वी विद्यार्थी व प्रशासन, विद्यार्थी विरूद्ध विद्यार्थी, कुलगुरू विरुद्ध कुलसचिव, विद्यार्थी नेते विरुद्ध परीक्षा विभाग, असे वाद रंगले. अनेक वेळा या वादात पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला. आता कुलसचिवांनी त्रस्त होत राजीनामा देण्याची बाब उजेडात आली आहे.
विद्यापीठात कार्यरत काहींनी गैरप्रकार केल्याने त्रस्त झालेल्या कुलसचिव डॉ. आनंद पाटील यांनी राजीनामा दिला. मात्र, कुलगुरू प्रा.के.के.सिंग यांनी तो फाडून फेकल्याचे वृत्त आहे. तसेच डॉ. पाटील यांना कुलसचिव म्हणून कार्यरत राहण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली.
हेही वाचा…यवतमाळ : रस्त्यावरील खड्ड्यांत मत्स्यपालन; वंचितचे अनोखे आंदोलन
‘कुलसचिवपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर मला संशोधन कार्यासाठी वेळ मिळेनासा झाला आहे. तसेच विद्यापीठाच्या दुरस्थ शिक्षण विभागाचा मी संचालक असल्याने या विभागाच्या योजना अंमलात आणण्यासाठी मी लक्ष देवू शकत नाही. त्यामुळे कुलसचिवपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करण्यात यावे,’ असे कुलसचिव डॉ. पाटील यांनी कुलगुरूंकडे दिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
या संदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, राजीनामा दिल्याची बाब खरी आहे. मात्र, कुलगुरू प्रा.के.के.सिंग यांनी तो नामंजूर करीत मला यथास्थिती कार्य करण्यास सूचविले. मात्र, ही घडामोड सहज झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली. अन्य विभागातील एका वरिष्ठावर आर्थिक गैरप्रकार केल्याचे आरोप असून चौकशी समितीने ते मान्यही केले. सदर व्यक्तीस राजीनामा मागण्यात आला. मात्र तो काही कारणास्तव थांबला. मात्र यानंतर वादाने भलतेच वळण घेतले. त्याचा त्रास कुलसचिव डॉ. पाटील यांना साततत्याने होत गेला. त्याबद्दल डॉ. पाटील यांनी वरिष्ठांनाही अवगत केले होते. पण सुधारणा दिसून न आल्याने शेवटी त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे विद्यापीठातील एकाने नमूद केले. ३८ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.
हेही वाचा…‘‘आपले सरकार व गृहमंत्री असतानाही…” अमोल मिटकरींचा संताप; पोलीस ठाण्यात ठिय्या
कुलसचिव डॉ. पाटील हे एक विद्वान प्राध्यापक म्हणून विद्यापीठात ओळखले जातात. मूळचे नांदेड येथील पाटील यांचा साहित्य, नाट्य, सिनेमा अध्ययन, पत्रकारिता या विषयात हातखंड आहे. त्यांनी यापूर्वी ई.टीव्ही.त पटकथा लेखक, उस्मानिया विद्यापीठात राजभाषा निदेशक, विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन तसेच विविध ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांनी राजीनामा घेण्याची भूमिका घेतल्याने विद्यापीठात चांगलीच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…भाजपा नेते आशीष देशमुख यांचा महायुतीला घरचा आहेर, म्हणाले “केदार यांना वळसे पाटील पाठीशी घालत आहे.”
विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रजनीशकुमार शुक्ल असताना चांगलेच वाद निर्माण झाले होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर कुलगुरूपदी निवड झालेली नाही. वरिष्ठावर हंगामी कुलगुरूपदाची जबाबदारी सोपवून काम सुरू आहे. कुलगुरू निवडीची प्रक्रिया केंद्रीय शिक्षण खात्याकडून सुरू झाल्याची माहिती आहे. मात्र तोपर्यंत विद्यापीठात आणखी काय वाद रंगणार, याची चर्चा सुरूच आहे.
© The Indian Express (P) Ltd