Marathi schools closed : वर्धा : विद्यार्थी पटसंख्या हा निकष लागला आणि अनेक शाळांना अखेरची घरघर सूरू झाली. काही शाळा वर्षांपासून आचके देत होत्या. आता त्या बंद पडल्या. त्यावर शिक्षण विभागाने अधिकृत शिक्कामोर्तब आता केले आहे. यात काही नामांकित शाळा पण असल्याने शिक्षण वर्तुळ स्तब्ध झाले आहे.

शून्य शिक्षक

जिल्ह्यातील शैक्षणिक सुधारणा आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर हे कारण देत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने (माध्यमिक) एक पाऊल उचलले आहे. सन २०२५-२६ च्या संच मान्यतेमध्ये ज्या शाळांमध्ये ‘शून्य शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदे’ मंजूर झाली आहेत, अशा शाळांमधील विद्यार्थी आणि शालेय दस्तऐवज तातडीने जवळच्या शाळांमध्ये हस्तांतरित करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे यापूर्वीच समायोजन करण्यात आले आहे. मात्र, ज्या शाळांमध्ये आता एकही शिक्षक किंवा कर्मचारी कार्यरत नाही, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांचे नजीकच्या शाळांमध्ये स्थलांतर करणे अनिवार्य झाले होते. शासन स्तरावरून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ही कार्यवाही केली जात असल्याचे सांगण्यात आले.

हस्तांतरण होणाऱ्या शाळा

जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत यादीनुसार, एकूण ८ शाळांमधील विद्यार्थी आणि दस्तऐवज पुढीलप्रमाणे हस्तांतरित केले जातील.

  • हिंगणघाट तालुका: अरुण थुटे लोकविकास विद्यालय (सेलु-मुरपाड) येथील विद्यार्थ्यांचे हस्तांतरण सौ. मिराबाई महंतारे माध्यमिक विद्यालय (काजळसरा) येथे करण्यात येईल. तसेच स्व. इंदिरा गांधी विद्यालयाचे हस्तांतरण मातोश्री खोडे प्राथमिक शाळेत होईल.
  • आर्वी तालुका: भारत माता विद्यालय (बोरगांव) येथील विद्यार्थी आता उच्च प्राथमिक शाळा, बोरगांव (हातला) येथे शिक्षण घेतील. आदर्श विद्यालयाचे हस्तांतरण पीएमश्री नगर परिषद हायस्कुलमध्ये करण्यात आले आहे.
  • देवळी तालुका: नवजीवन माध्यमिक विद्यालयाचे (दहेगांव) यशवंत विद्यालय (सोनोरा) येथे, तर नूतन विद्यालयाचे (कवठा रेल्वे) यशवंत विद्यालय (वायफळ) येथे विलीनीकरण होणार आहे.

इतर तालुके

सेलु तालुक्यातील संत नानाजी महाराज विद्यालयाचे महाकाळ येथील माध्यमिक विद्यालयात, तर कारंजा तालुक्यातील जगदंबा विद्यालयाचे नवप्रभात विद्या मंदीर (ठाणेगांव) येथे हस्तांतरण करण्याचे निर्देश आहेत. याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

शिक्षणाधिकारी (Middle School ) यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवळी आणि कारंजा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेवर स्वतः लक्ष देऊन हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या बंद करण्यात आलेल्या शाळांपैकी सुरगाव व अन्य नामवंत शाळा म्हणून ओळखल्या जात होत्या. अन्य काही शाळांनी बंद निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षक नेते संतप्त

वर्धा जिल्ह्यातील दहाचे वर मराठी शाळा बंद झाल्या, याव्यतीरिक्त काही न्यायालयात व समायोजनातील अडचणीमुळे थांबून आहेत. कित्येक वर्षापासून या शाळा चालविल्या जात होत्या. शासनाचे अनुदानित शाळा बद्दल असलेले उदासीन धोरण, २०१२ पासून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया व्यवस्थित न राबविणे, वेतनेत्तर अनुदान न मिळणे, १५ मार्च २०२४ चा शासननिर्णयामुळे कमी झालेली शिक्षकसंख्या यामुळे मराठी शाळा बंद झाल्या आहेत, असे विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य सतीश जगताप सांगतात. तर कित्येक शाळेत अपुरे शिक्षक संख्या मंजूर असल्याने बऱ्याच वर्ग तुकडीस शिक्षक मंजूर झालेले नाहीत. या सत्रासाठी काही निकष शिथिल केल्याने तूर्त वाचल्यात पण पुढील वर्षी जिल्ह्यातील शाळा बंद ची स्थिती ४० च्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.उपरोक्त बाबी विद्यार्थी पटसंख्या कमी होण्यास कारणीभूत ठरल्या. इंग्रजी माध्यमाच्या व स्वयं अर्थसहायीत शाळांना अंतराचे निकष नं पाळता जागोजागी परवानगी देण्याची बाब नामवंत शाळांच्या मुळावर आली, अशी टीका सतीश जगताप करतात.