वर्धा : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन हे चटका लावणारे ठरले. त्यांच्या अनेक दशकाच्या सत्ताकारणात व राजकारणात त्यांचा संबंध आलेले व त्यातून दादांशी जोडल्या गेलेले नेते अद्याप दुःखातून सावरलेले नाही. खासदार अमर काळे हे त्यापैकीच एक. त्यांची दादांसोबत खूप वेळा बातचीत झाल्याचे ते सांगतात. अश्या भेटीत दादा सूचक बोलायचे व सल्ला पण देऊन जायचे. असाच एकदा दादांनी खासदार काळे यांना सल्ला दिला होता.

अमर काळे पक्के काँग्रेसी. त्यांचे वडील डॉ. शरद काळे हे शरद पवार यांचे काही काळ सहकारी राहल्यानंतर काँग्रेसमध्ये आले आणि आयुष्यभर काँग्रेसचे राजकारण केले. पुढे अमर काळे हे आमदार झाले. १३ वर्ष त्यांना विधानसभेत दादांचे मार्गदर्शन लाभल्याचे ते सांगतात. असेच एकदा दादांनी त्यांना म्हटले की पटकन काम मार्गी लागायचे असेल तर तू राष्ट्रवादीत येऊन जा. आमचे निर्णय मुंबईत होतात. दिल्लीत नाही. त्यावर मी हसत दादांना म्हणालो की आहे तिथेच राहू द्या दादा.

पुढे अमर काळे यांना शरद पवार यांनी स्वतःच्या पक्षात घेत खासदार म्हणून निवडून आणले. खा. काळे म्हणतात विधानसभेत राजकीय व्यक्तीचा वावर कसा असावा व आपली राजकीय शक्ती कशी उपयोगात आणावी, हे दादांनी मला अनेकवार सांगितले. माझे मामेबंधू सलील अनिल देशमुख यांची तब्येत बघायला दादा नागपूरला आले होते. तेव्हा त्यांच्याशी भेट झाली होती. तीच शेवटची भेट ठरली. दादांची एक महत्वाची आठवण आहे. मी पहिल्यांदा आमदार झालो होतो. माझ्या आर्वी मतदारसंघात प्रकल्पग्रस्त लोकांचा लढा सूरू होता. या मागणी संदर्भात मी विधानसभेत लक्षवेधी लावली होती. तेव्हा दादांनी त्वरित प्रतिसाद दिला. प्रकल्पग्रस्त लोकांसाठी ५ कोटी रुपये मंजूर करून टाकले. आज दादा आपल्याला सोडून गेले, यावर विश्वासच बसत नाही, अशी भावना खा. काळे व्यक्त करतात.

विशेष म्हणजे खा. काळे यांची सासूरवाडी असलेल्या शिंदे कुटुंबाशी पवार परिवाराचे घनिष्ठ नाते राहले आहे. त्यामुळे पवार कुटुंबात खासदार काळे यांना नेहमी जावयाचा मान असतो. दादांचे असे अकाली व दुर्दैवी निधन हे या काळे परिवारास मोठे दुःख देणारे असल्याची भावना आहे.