वर्धा : आईच्या अनवधानाने अंगावर दूध पिणाऱ्या बाळाचा जीव जावू शकतो. हा प्रकार वेदनादायीच. असे ५३ बाळ गत ५ वर्षात झाल्याची धक्कादायी आकडेवारी पुढे आली आहे. नवजात बालकांच्या आरोग्याबाबत एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ ‘मिल्क एस्पिरेशन’ (दूध श्वासनलिकेत जाणे) मुळे तब्बल ५३ बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
असे मृत्यू आता रोखणार
या गंभीर परिस्थितीची दखल घेत आरोग्य विभागाने बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आता कंबर कसली असून, एका विशेष मोहिमेचे नियोजन केले आहे. दूध पाजल्यानंतर ढेकर काढणे गरजेचे असते. अनेकदा मातांना नवजात बाळाला दूध पाजण्याच्या योग्य पद्धतीची माहिती नसते. दूध पाजल्यानंतर बाळाच्या पाठीवरून हात फिरवून त्याचा ढेकर काढणे अत्यंत आवश्यक असते. ढेकर न काढल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने दूध पाजल्यास दूध पोटात जाण्याऐवजी श्वासनलिकेत अडकते. यामुळे बाळाचा गुदमरून मृत्यू होतो, यालाच वैद्यकीय भाषेत ‘मिल्क एस्पिरेशन’ म्हटले जाते.
यामुळे आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ७ दिवस दररोज गृहभेट देणार. बालमृत्यूचे हे प्रमाण पूर्णपणे रोखण्यासाठी आरोग्य विभागाने नवजात बाळांना ७ दिवस दररोज गृहभेट देण्याचे महत्त्वपूर्ण नियोजन केले आहे. या मोहिमेत आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून प्रत्येक नवजात बालकाच्या घरी सातत्याने भेट दिली जाईल. “बालमृत्यू टाळण्यासाठी नवजात बाळांना ७ दिवस दररोज गृहभेटीचे नियोजन करण्यात आले आहे. बालमृत्यू हा कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येत आहे,” अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. वाघमारे यांनी दिली.
मातांना दिल्या जाणाऱ्या सूचना
आरोग्य विभागाने गृहभेटीदरम्यान मातांना काही गोष्टींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. (Position)- दूध पाजताना बाळाचे डोके नेहमी थोडे वरच्या बाजूला असावे. झोपवून दूध पाजू नये. दूध पाजून झाल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन त्याची पाठ थोपटावी आणि ढेकर काढणे अनिवार्य आहे. बाळाला केवळ आणि केवळ आईचेच दूध द्यावे, वरचे दूध देणे टाळावे. नवजात बालकांचे वजन नियमितपणे मोजणे, तसेच बाळ आजारी असल्याच्या लक्षणांवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
अधिकारी व सेविकांना निर्देश
संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावर नियमित गृहभेटी देऊन या मोहिमेचा सखोल आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.या मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी गृहभेटीदरम्यान पहिल्या, तिसऱ्या आणि सातव्या दिवशी प्रामुख्याने लक्ष ठेवणार आहेत. बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी मातांनी या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. थोडीशी जागरूकता आणि योग्य काळजी अनेक निष्पाप बालकांचे प्राण वाचवू शकते.
