वर्धा: जिल्ह्यात धरण पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला वर्धा पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या विविध जलप्रकल्पांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी जाहीर झाली असून, मुख्य धरणांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती संथ गतीने सुधारत असल्याचे चित्र आहे.

पाटबंधारे विभागाने जारी केलेल्या दैनिक अहवालानुसार, जिल्ह्यातील प्रमुख आणि मध्यम अशा १५ प्रकल्पांमध्ये संमिश्र पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये ‘निम्न वर्धा’ प्रकल्पात सर्वाधिक ६१.६६% पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या पावसाचा जोर मर्यादित असल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांचे दरवाजे (गेट्स) पूर्णपणे बंद आहेत आणि कोणत्याही प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.

प्रमुख धरणातील साठा

प्रमुख धरणांचा विचार केला तर निम्न वर्धानंतर वर्धा कार नदी प्रकल्प ५६.४५% आणि ‘बोर प्रकल्प’ ५६.१२% पाणीसाठ्यासह आहेत. तसेच उर्ध्व वर्धा धरण ५०.५१% भरले असून, धाम प्रकल्पात ४८.७८% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील काही लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापही पाणीटंचाईचे संकट गडद आहे. मदन उन्नई धरण सध्या ०.००% म्हणजेच पूर्णपणे कोरडे असून प्रशासनाची चिंता वाढवणारे आहे. याशिवाय सुकळी लघु प्रकल्प (१४.७०%), नांद प्रकल्प (१५.६३%) आणि पोथरा प्रकल्प (१८.६६%) या धरणांमध्ये अत्यंत अल्प पाणीसाठा शिल्लक आहे.
इतर प्रकल्पांमध्ये वडगाव २४.१५%, पंचधारा २६.५१%, मदन प्रकल्प २९.९२%, लाल नाला ३०.१५% तर डोंगरगाव प्रकल्पात ३४.३७% जलसाठा निर्माण झाला आहे.

पुढील काळ महत्वाचा

आगामी काळात दमदार पाऊस झाल्यासच या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरी पूरपरिस्थिती किंवा विसर्गाची शक्यता नसल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा कोणताही इशारा दिलेला नाही, मात्र परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

आजवर झालेले पर्जन्य

वर्धा जिल्ह्यात पावसाची संततधार ३ दिवसापासून आहे.आष्टीच्या साहूर मंडळात ५६२% पाऊस, तर समुद्रपूर आणि हिंगणघाटमध्ये चिंता आहे. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात ४ जुलै २०२६ पर्यंत झालेल्या पावसाची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असून, काही तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे, तर काही भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ४ जुलै रोजी सकाळी मिळालेल्या अहवालानुसार, वर्धा जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत १०२.२% पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आष्टी तालुक्याने पावसाच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. आष्टी तालुक्यात जूनपासून आतापर्यंत २९९.२ मिमी पाऊस झाला असून, हे प्रमाण सरासरीच्या १८६% आहे. यात विशेष म्हणजे आष्टी तालुक्यातील साहूर (Sahur) मंडळात जुलैच्या सुरुवातीलाच सरासरीच्या तब्बल ५६२.६% (१७८.९ मिमी) पावसाची नोंद झाली आहे. तसेच तळेगाव मंडळात २३५.७% पाऊस झाला आहे.

अन्य तालुक्यातील पाऊस

जून महिन्यापासून आतापर्यंत सरासरीच्या १४१.६% पाऊस झाला आहे. वाधोना (Wadhona) मंडळात १९३.५% प्रगतीशील पाऊस झाला आहे. कारंजा तालुका येथे सरासरीच्या १६५.२% पाऊस पडला असून, सरवाडी मंडळात जुलै महिन्यात ३५२% पाऊस झाला आहे. हिंगणघाट आणि समुद्रपूरमध्ये पावसाची ओढ दिसून येते. जिल्ह्यातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलीआहे. हिंगणघाट तालुक्यात जून महिन्यापासून सरासरीच्या केवळ ७६.५% (१५८.२ मिमी) पाऊस झाला आहे. हिंगणघाट आणि वाघोळी मंडळात जून महिन्यामध्ये सरासरीच्या केवळ २६ ते ३०% पाऊस पडला होता. समुद्रपूर तालुक्यात तालुक्यात सरासरीच्या ७२.७% पाऊस नोंदवला गेला आहे. जाम (५४.३%) आणि मांडगाव (५७.३%) मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. सेलू तालुक्यातही सरासरीच्या ७७.८% पाऊस झाला असून हिंगणी मंडळात सर्वात कमी (६५.३%) पाऊस झाला आहे.

पेरणीसाठी अधिक पाऊस अपेक्षित

४ जुलै रोजी जिल्ह्यात सरासरी १९.७ मिमी पावसाची नोंद झाली, ज्यामध्ये देवळी, वर्धा आणि आष्टी भागात चांगला पाऊस झाला. पुढील काही दिवसांत हिंगणघाट आणि समुद्रपूर भागात चांगला पाऊस न झाल्यास शेतीच्या कामांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरण्या तर आटोपल्या. बियाणे पण अंकुरले. आता या पावसात सातत्य अपेक्षित आहे. विशेष म्हणजे नेहमी पूर येणाऱ्या हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात पावसाने दांडी मारली आहे. येथील शेतकरी सध्या चिंतेत असल्याचे चित्र आहे.