वर्धा : लोकनिर्वाचित एखादे पद नेत्यास मिळाले की तो पक्षात नेहमीसाठी आब राखून असतो.. पुढे पडला तरी त्यास विविध स्वरूपात सामावून घेतल्या जातेच. विद्यमान असेल तर विविध समित्या त्यास मिळतात. आता राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे अमर काळे खासदार तर झाले. पण विरोधी पक्षाचे. त्यामुळे सत्तेत वाटा नाहीच. मात्र त्यांनी संसदेत दाखवलेली चुणूक त्यांना एका महत्वाच्या पदावर नेणारी ठरली आहे. लोकसभा सचिवालयाने १८ व्या लोकसभा कार्यकाळासाठी भारत – युक्रेन संसदीय मैत्री गटाची स्थापना केली आहे. त्यात खा. काळे यांची वर्णी लागली आहे. या दोन देशातील संसदीय, सांस्कृतिक व द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी हा गट कार्य करणार. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी काळे यांना प्राप्त झाली आहे.

अगदी थोड्या कालावधीत खा. काळे यांनी एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून छाप पाडल्याचे बोलल्या जाते. मतदारसंघातील तसेच सार्वजनिक हिताचे प्रश्न त्यांनी लोकसभेत लावून धरले आहे. उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख दिल्या जात असते. आता या समितिच्या माध्यमातून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडतील, असा विश्वास पक्षातर्फे व्यक्त केल्या जात आहे. पक्षनेते शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

माजी खासदार रामदास तडस हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष झाले आहेत. त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र तरीही पक्ष किंवा केंद्रीय सत्तेत वाटा मिळण्याची खात्री त्यांचे समर्थक व्यक्त करीत होते. ते महाराष्ट्र तैलिक महासंघाचे अध्यक्ष असून विदर्भात मोठ्या संख्येत असलेल्या या तेली समाजावर त्यांची चांगली पकड असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. प्रदेश कार्यकारिणीत विदर्भातून तिघांची उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. रामदास तडस, प्रवीण पोटे व संजय भेंडे हे तिघे विदर्भातून असून त्यापैकी तडस यांचा चार जिल्ह्यात प्रभाव असल्याचे सांगण्यात येते.

यापूर्वी तडस हे स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघातून विधान परिषदेचे दोन वेळा आमदार राहून चुकले. उपाध्यक्ष या पदास भाजपमध्ये महत्वाचे समजल्या जाते. विदर्भातील उपाध्यक्ष हा जिल्हा तसेच विदर्भ प्रदेश संघटनात्मक बाबीत पदसिद्ध सदस्य असतो. तसेच राष्ट्रीय पातळीवरील निवडणुकीत त्यास प्रभारी म्हणून पाठविल्या जाते. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा विदर्भाबाहेरील असला तर येथील कार्यकर्त्यांना त्याच्याशी संवाद साधने अवघड ठरते. म्हणून विभागातील पक्षीय बाबी प्रदेश स्तरावर मांडण्यासाठी उपाध्यक्ष हे पद महत्वपूर्ण ठरते. रामदास तडस हे कुस्तीगीर संघाचे पण अध्यक्ष आहेत. क्रीडा क्षेत्रात पण त्यांचे वजन असल्याने पक्षास त्यांचा फायदा मिळू शकतो, असे एका भाजप नेत्याने स्पष्ट केले.