वर्धा : पालिका निवडणुकीचा प्रथम टप्पा सुरू झाला आणि पक्षीय घडामोडीस चांगलाच वेग आला. लोकसभा, विधानसभा निवडणुकी प्रमाणेच ही पालिका निवडणूक देखील महत्वाची. पक्षाच्या अस्तित्वाची. असे इशारे सर्व पक्षाच्या श्रेष्ठनी दिलेत. आता अधिकृत सर्व कामाला लागलेत पण खरी बाजी भाजप नेते लावत असल्याचे दिसून येत आहे.
याचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच. पालिका निवडणुकीची चाहूल लागताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात प्रत्येक जिल्ह्याची बैठक घेतली. त्यात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांस बोलाविण्यात आले होते. त्या वेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व अन्य संघटनात्मक नेते हजर झाले होते. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट करून टाकले की मला या निवडणुकीत रिझल्ट हवे. कारणे नकोत. काय उणीवा ते आत्ताच सांगा.
मग कुणावर खापर फोडून मोकळे होवू नका. अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे एका पदाधिकाऱ्याने नमूद केले. प्रत्येक पालिकेतील प्रमुख पदाधिकारी व महत्वाच्या नेत्यांची त्यांनी वन टू वन मुलाखत घेतली. कोण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यास ईच्छुक त्याची विचारणा झाली. तुम्ही काय ते खरे सांगा. आम्ही परत सर्व्हे करणार आहोच. त्यात काय खरे खोटे दिसून येईलच. असेही या बैठकीत सांगण्यात आले. राबविलेले उपक्रम व सदस्य नोंदणी याची फाइल यावेळी तपासण्यात आली. उमेदवारी ही निवडून येण्याची क्षमता व पक्ष कार्य याच आधारे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हीच बैठक भाजप नेत्यांची कान पिळणारी ठरल्याचे जिल्ह्यातील एका आमदारने नमूद केले. कारण वर्धा जिल्ह्यात भाजपचा एक मंत्री व चार आमदार आहे. मावळत्या कार्यकाळात जिल्ह्यातील सहाही पालिकेत भाजप सत्ताधारी राहली. त्यावेळी तीनच आमदार होते. आता तर सर्व आमदार आहेत. म्हणून तेच यश मिळाले पाहिजे अशी अपेक्षा जिल्हा पदाधिकारी यांच्याकडून ठेवण्यात आल्याने सर्व पेचात आहे.
जिल्ह्यात भाजपचे मंत्री डॉ. पंकज राजेश भोयर तसेच सुमित वानखेडे, समीर कुणावार, राजेश बकाने व दादाराव केचे हे चार आमदार आणि रामदास तडस व सुरेश वाघमारे हे दोन माजी खासदार असा बडा नेत्यांचा बडा लवाजमा आहे. निवडणूक प्रमुख तडस व प्रभारी डॉ. भोयर असे तेली कुणबी समीकरण ठेवून निवडणूक सूत्र ठेवण्यात आले. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली तंबी भाजप नेत्यांसाठी परीक्षा ठरत आहे.
