वर्धा : मृच्छकटिक नाटकातील चोराची व्यक्तिरेखा असणारं शर्विलक हे पात्र प्रेक्षकांमध्ये बरंच लोकप्रिय ठरलं होतं. महिलांसाठी चोरी करणाऱ्या या पात्राप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही अशाच एका शर्विलकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात एका भामट्यास थक्क करणारा पाठलाग करीत पोलिसांनी अटक केली आहे. कारण त्याने अनेक जिल्ह्यातील महिलांना त्रस्त करून सोडले होते. वर्धा, अमरावती, यवतमाळ, जळगाव, भुसावळ या जिल्ह्यातील महिलांना रडू कोसळले होते.
महिलाच का?
हा हसनेन उर्फ हसन अली जाफर अली नामक शर्विलक मूळचा भुसावळ येथील. त्याने महिलांना सावज करणे सूरू केले. महिलांच्या भोळेभाबडेपणाचा गैरफायदा त्याने घेतला. तो व त्याचा सोबती एका गाडीवर बसून शहरातील निवांत भागात टेहळणी करीत. गळ्यात सोन्याने मढलेली महिला दिसली की एक तिच्याजवळ जाऊन कुणाचा तरी पत्ता विचारी. महिला विचारात पडली की दुसरा गळ्यातील दागिणे हिसकावून घ्यायचा. दोघेही गाडीवर बसून पोबारा करायचे.
एकाच दिवसात अनेक गुन्हे
हे अट्टल असे chain स्नॅचेर असल्याचे पुढे दिसून आले. वर्ध्यात एकाच दिवशी सावंगी, वर्धा शहर व रामनगर भागातील महिलांना या हसनने लुटले होते. याचा लवकर तपास लागावा म्हणून पोलिसांवर दबाव वाढत चालल्याने पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी चार पथक तयार केले. घटना घडलेल्या भागातील मोबाईल, सिसिटीव्ही फुटेज, कॅमेरा पाहणी या माध्यमातून तपास सूरू झाला. AI तंत्र कामात आले. आणि चमू पाठलाग करीत ग्वाल्हेर येथे धडकली. दोन चमू भोपाळ व बैतुल येथे गेल्या. मात्र तिथे सुगावा लागला की आरोपी अमरावतीत दबा धरून बसला आहे. तिथे हसनला ताब्यात घेत असतांना त्याने पळ काढला. मात्र भर शहरात त्याचा पाठलाग करीत त्यास बेडया ठोकण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक म्हणतात
हा अट्टल व महिलांना त्रस्त करून सोडणारा गुन्हेगार अनेक जिल्ह्यातील पोलिसांना हवा होता. पण वर्धेने बाजी मारली. म्हणून ही उपलब्धी सांगण्यासाठी अधीक्षक अग्रवाल यांनी खास पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की २०२४ पासून हा महिलांना लुबाडण्याचा गुन्हा घडत होता. विविध जिल्हात आरोपीने असे दहा गुन्हे केले आहेत. महाराष्ट्रात तसेच मध्यप्रदेशात आरोपी हसन व त्याचे साथीदार धुमाकूळ घालत होते. अखेर मुख्य हाती लागला असून त्याचे चार साथीदार लवकरच सापडतील असे अधीक्षक अग्रवाल यांनी नमूद केले. त्याचे आतंक उर्फ सादिक व मोहम्मद अली हे दोन साथीदार आहेत. तसेच सुखेना अली व सना अली दोन महिला पण यात मदत करीत होत्या. या भोपाळ येथील आहेत.
सोनार ताब्यात
तूर्तास वर्धा पोलिसांना सव्वाशे ग्रॅम सोने, एक दुचाकी व मोबाईल जप्त केले. यापूर्वी पण आरोपी हसन याने काही गुन्ह्यात चोरलेल्या सोनं दागिन्याची विल्हेवाट लावून टाकली आहे. हे दागिणे लंपास करायचे व साथी महिला त्याची विक्री सोनारास करीत असत. ते विकत घेणाऱ्या एका मध्यप्रदेशातील सोनारास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अन्य आरोपी अटकेत आल्यावर नेमके किती सोने लंपास करण्यात आले, याचा तपशील पुढे येईल. Ai माध्यमातून आरोपीची चेहरे ओळख पटविण्यास मोठी मदत झाली आहे.
कामगिरी फत्ते करणारी चमू
अधीक्षक अग्रवाल व अपर अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी प्रत्यक्ष तपास सूरू केला होता. त्यांना उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू तसेच पोलीस कर्मचारी नरेंद्र पाराशर, सचिन इंगोले, चंद्रकांत बुरंगे, संजय राठोड, भूषण निघोट, प्रमोद पिसे, पवन पन्नासे, अमोल नगराळे, दीपक साठे, मिथुन जिचकार, मंगेश चावरे, सुगम चौधरी, शुभम राऊत, अरविंद इंगोले तसेच सायबर शाखेचे दिनेश बोधकर, गोविंद मुंढे, अक्षय राऊत, स्मिता महाजन, अखिल इंगळे, रितेश गेटमे यांनी सहकार्य केले.
