वर्धा : गुन्हा करीत पोबारा करणारे अनेक आरोपी असतात. त्यांचा शोध घेता घेता पोलिसांच्या नाकी नऊ येतात. महिने उलटतात, तेव्हा कुठे आरोपी हाती लागण्याची उदाहरणे दिसतात. या पार्श्वभूमीवर ५ ऑगस्ट रोजी चार व्यक्तींना उडवून पळ काढणाऱ्या एका ट्रक चालकास आठच दिवसात पकडून आणण्याची कामगिरी पोलिसांनी यशस्वी करुन दाखविली आहे. या दिवशी देवळी तालुक्यातील इंजापूर येथून एक ऑटोरिक्षा पुलगावकडे निघाली होती. रस्त्यात केळापूर येथे एक तरुणी, दोन पुरुष व दोन स्त्रिया या ऑटोत बसल्या. पुढे एक किलोमीटर अंतरावर हा ऑटो असतांना त्यास एका ट्रक कंटेनरची त्यास धडक बसली. या भीषण अपघातात चार व्यक्तींचा मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी पुलगाव पोलिसांकडे तक्रार दखल झाल्यावर अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या गंभीर अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक चालक फरार झाला होता. त्यास शोधायचे कुठे हा प्रश्न पडल्यावर सहायक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर यांच्या नेतृत्वात तपास चमू गठीत केली. तपासात प्रथम रस्त्यावर एका ठिकाणी सिसिटीव्ही फुटेज सापडले. त्यात ट्रक क्रमांक डब्लू - ११- एफ- २१७७ असल्याचे दिसून आले. ट्रक व चालक कोलकता येथील असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी जंग जंग पच्छाडले. उपनिरीक्षक निंबाळकर तसेच अमोल जिंदे, रवी जुगनाके, ओम तल्लारी यांनी कोलकता परिसरात स्थानिक पोलिसांची मदत घेत शोध सूरू केला. कोलकता, हावरा, हुगळी व अन्य शहरात ही चमू फिरली. अखेर त्यास यश आलेच. आरोपी ट्रकचालक अरुणसिंग शत्रुघ्न सिंग यांस ढाणकुणी पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. तो मूळचा बिहार येथील गोपालगंज जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यास अटक करण्यात आली असून ट्रक कंटेनर पण जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सुधीर लडके, चंद्रशेखर चुटे, रितेश गुजर, विश्वजित वानखेडे, उमेश बेले यांचाही हातभार लाभला. हेही वाचा.“रामदास आठवले हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार,” कोण म्हणतंय असं? तसेच पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर अधीक्षक डॉ. सागर कवडे तसेच राहुल चव्हाण, राहुल सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. एकाचवेळी चार व्यक्तींचा बळी गेल्याने केळापूर परिसरात घटनेनंतर आक्रोश उडाला होता.