वर्धा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी खास योजना म्हणून पोलिसांच्या श्वान पथकासाठी विश्रामगृह बांधण्याची तयारी केली त्यासाठी ९४ लाख रुपयाचा निधी मंजूर केला. या निधीतून दोन मजली इमारत, देखभाल, आहार, प्रशिक्षण व अन्य बाबी अंमलात येणार आहे. खास बंदोबस्त असला तर इतर जिल्ह्यातून श्वान पथक येतात. त्यांची पण इथेच व्यवस्था होणार. खास भोजन तयार करण्यासाठी किचन ओटा पण बांधल्या जाणार आहे. प्रत्येक श्वानास स्वतंत्र खोली लाभणार. हे असे खास आरामदायी वातावरण व विशेष भोजन लाभणार, म्हणुन चर्चा सूरू झाली. लोकसत्ता ऑनलाईनची ही बातमी वाचून एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने मजेशीर किस्सा सांगितला. श्वानाचे मटण जर अधिकारी व प्रशिक्षक (Handler) यांनीच लंपास केले तर ? अशी शंका या अधिकाऱ्याने उपस्थित करीत किस्सा सांगितला.
१९९४ सालची ही घटना
हा निवृत्त अधिकारी सांगतो की श्वान पथकाचे मटण अधिकाऱ्यानेच मटकावले होते. त्यावेळी पोलीस अधीक्षक संजय बर्वे (Rtd Police Commissinor Mumbai) हे होते. झाले असे की वर्धा जिल्हा पोलीस दलाचे स्वतंत्र श्वान पथक होते. यातील कुत्र्यांसाठी मटण आदी मांस आणल्या जायचे. त्यासाठी खास निधीची तरतूद केल्या जात होती. ठरला तेवढा मटण कोटा साप्ताहिक दिल्या जायचा.
मटण फस्त पण श्वान सुस्त…
हे मटण इतवारा मटण मार्केटमधून आणायला पथक प्रशिक्षक जायचा. पण तो लबाडी करायचा. म्हणजे कुत्र्यांसाठी दुय्यम, टाकून दिलेले मास मोफत घ्यायचा व चांगले मांस स्वतःसाठी व त्याच्या वरीष्ठासाठी न्यायचा. बिल चांगल्या मांसाचे. बिल बरेच थकीत राहल्याने शेवटी हे प्रकरण पोलीस अधीक्षक बर्वे यांच्या दारी गेले. त्यांनी विचारपूस सूरू केली. मटण विक्रेता त्यांच्या दारी पोहचला.
गुपित उघडकीस आले…
थकीत कां, मांस कोण नेत होते, किती लागायचे असे व अन्य प्रश्न झाले. तेव्हा मटण विक्रेत्याने सत्य काय ते सांगून टाकले. परत चौकशी झाली आणि श्वान पथक प्रशिक्षकाने खरे काय ते सांगून टाकले. कपाळावर हात गेलेल्या SP यांनी तडक त्या प्रशिक्षक असलेल्या पोलिसास निलंबित करून टाकले. त्याच्यासोबत मटणाची चव घेणाऱ्या पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांस केवळ तंबी देण्यात आली. असे हे प्रकरण आजच्या बातमीने परत चर्चेत आले. त्या निलंबित पोलिसाची मात्र गमतीदार ओळख झाली होती. त्यास हाक देतांना भाऊ ऊ,,,,, असा कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज गंमतीत काढल्या जात होता, अशी मजा या अधिकाऱ्याने सांगितली. शेवटी यांस कंटाळून त्या शिपायाने यवतमाळ येथे बदली मागून घेतली होती.
आता तसे नाही…
आता तर सुसज्ज निवास व भोजनालाय बांधल्या जाणार. चमचमीत भोजन मिळणार. मग अधिकाऱ्यांचे चांगलेच फावणार ? असा प्रश्न श्वान पथकशी संबंधित एकास केल्यावर तो म्हणतो आता तसे होणार नाही. मटण देणे बंद करण्यात आले आहे. कारण अनेकदा तपास कार्यात जंगलात जावे लागते. १०, १० दिवस थांबावे लागते. मग तिथे श्वानांसाठी मांस कुठून आणणार. सोबत मांस वाहून नेणे शक्य नाही. म्हणुन आता मांस मूल्य असलेले Dog Food देणे सुरू केले आहे. मटण देणे पोलिसांनी बंदच केले आहे. अशी ही माहिती पुढे आली. पण श्वानांसाठी चमचमीत भोजन ऐकल्यावर अनेकांना निलंबित पोलिसाचा किस्सा आठवला.
