वर्धा : आम्ही कोण? म्हणून काय पुसशी? दात वेंगाडूनी… थोर कवी केशवसूत यांची ही कविता आठवायचे कारण म्हणजे सभ्य शब्दात श्वान व प्रचलित शब्द म्हणजे कुत्रा. त्याची महती ती काय. असेच कोणी म्हणेल. कारण या प्रजातीच्या भटक्या प्रवर्गाने काय तो उच्छाद मांडला ते सांगायला नको. पण यांचीच एक प्रजाती म्हणजे तरबेज श्वान. हे पोलीस दलातील श्वानपथक तर खूप कामाचे. केशवसूत यांची कविता कवीसाठी. आम्हास हिणवू नका, आमचे सामर्थ्य बघा, असा हा टोला. तेच सूत्र पोलीस पथकतील या श्वानांचे. त्यांची कामगिरी खरंच अतुलनीय. काय काय तपास त्यांच्या माध्यमातून होतो, हे एव्हाना सर्वपरिचित. तर यांना ‘पालकमंत्री’ पावले आहेत.

श्वानपथक आणि देखभाल

तर पोलिसांकडचे हे श्वान, त्यांना सर्व तो मान. त्याची ही प्रचिती. राज्याचे गृह राज्यमंत्री असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी गेल्या काही दिवसात जिल्हा पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून अत्याधुनिक साधने, वाहने, सीसीटीव्ही कॅमेरे, इमारती होत आहेत. पोलिस तपासात महत्वाची भूमिका असलेल्या श्वास पथकासाठी स्वतंत्र इमारत बांधली जाणार असून या दोन मजली इमारतीसाठी ९४ लाख रुपये जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांनी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे पोलिस दलाच्या आधुनिकतेत आणखी भर पडणार आहे.

अशी होणार सोय…

पोलिस तपासात श्वान पथकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा शोध, बॅाम्ब शोधक व नाशक तसेच अमली पदार्थाच्या शोधासाठी श्वान अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे श्वान पथकांचा वापर पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर होत आहे. श्वानांची देखभाल, आहार, प्रशिक्षण तसेच त्यांच्या दैनंदिन व्यवहारासाठी स्वतंत्र इमारत असणे आवश्यक आहे. जिल्हा पोलिस दलाच्यावतीने पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याकडे यासाठी मागणी करण्यात येत होती. यावर्षीच्या जिल्हा नियोजनमधून ९४ लक्ष रुपये पालकमंत्र्यांनी यासाठी मंजूर केले आहे.

जिल्हा पोलिस दलाकडे सद्या पाच श्वास कार्यरत आहे. याशिवाय बॅाम्ब शोधक व नाशक पथकाकडे दोन श्वान आहेत. या पथकाकडे श्वानांसाठी वेगळी इमारत आहे. पोलिस दलाच्या पाच श्वानांसाठी मात्र वेगळी इमारत असणे आवश्यक होते. जिल्हा पोलिस दलास पाच श्वान मंजूर असले तरी भविष्यात ही संख्या ८ पर्यंत वाढण्याची शक्यता गृहीत धरता नव्याने बांधण्यात येणारी इमारत त्या क्षमतेची असणार आहे. या इमारतीमध्ये प्रत्येक श्वानासाठी स्वतंत्र खोली – पिंजरा असणार आहे.

कारण असे की…

बरेचदा व्हीव्हीआयपी बंदोबस्तासाठी इतर जिल्ह्यातून श्वान मागविले जातात. त्या श्वानांसह त्यांचे हस्तक व अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था देखील इमारतीत केली जाणार आहे. श्वानांसाठी भोजन बनविण्याकरीता किचन ओटा, भोजन ठेवण्याची सुविधा, श्वान पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसण्याची व्यवस्था तसेच आवश्यक फर्निचर सुविधा देखील या इमारतीमध्ये असणार आहे.

पोलिस दल अधिक गतिमान

जिल्ह्याचा पालकमंत्री असण्यासोबतच मी गृह विभागाचा राज्यमंत्री देखील आहे. त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील गृह विभाग अधिक गतिमान, आधुनिक कसा करता येईल, यावर माझा सुरुवातीपासूनच भर आहे. त्यामुळेच गेल्या दीड दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. पोलिसांसाठी अत्याधुनिक वाहने, शहरी भागात सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिसांच्या प्रशासकीय इमारती, निवासस्थाने यावर आपण विशेष लक्ष दिले आहे. पोलिस तपासात श्वान पथकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे त्यांची स्वतंत्र आणि चांगल्या वातावरणात देखभाल व्हावी, उत्तम प्रशिक्षण त्यांना मिळावे यासाठी ९४ लक्ष रुपये खर्च करून स्वतंत्र इमारत आपण बांधतो आहे, असे मत डॉ. पंकज भोयर व्यक्त करतात.