वर्धा: शासकीय कामाची बिलं हा नेहमी चर्चेचा विषय असतो. किती टक्के, हा प्रश्न विभागनिहाय व कंत्राटदारनिहाय ठरतो, असे नेहमी ऐकायला मिळते. पण बिल काढले नाही म्हणुन ठेकेदार आंदोलन, उपोषण व कधी कधी शासकीय अधिकाऱ्यांस मारहाण करीत असल्याचे नेहमी आपण ऐकतो. या घटनेत वेगळेच काही घडले आणि त्याचे सिसिटीव्ही मध्ये चित्रीकरण पण झाले.

वर्धा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कार्यालय पुन्हा एकदा एका मोठ्या वादामुळे चर्चेत आले आहे. बुधवारी कार्यालयीन वेळेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात शाखा अभियंता आणि एका शासकीय ठेकेदारामध्ये थेट फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली असून शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रस्त्याच्या कामावरून वाद पेटला

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाबाबत चर्चा करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता स्वप्नील खंडार आणि शासकीय ठेकेदार महेंद्र ठाकूर यांच्यात तीव्र बाचाबाची झाली. संवादादरम्यान वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या शाखा अभियंत्याने ठेकेदाराला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठेकेदारानेही शाखा अभियंत्याला धक्काबुक्की केली. या गदारोळात दोन्ही बाजूंनी जोरदार शिवीगाळ करण्यात आली आणि एकमेकांना ‘बघून घेण्याची’ धमकी देण्यात आली. कार्यालयात उपस्थित असलेल्या इतर कर्मचारी आणि ठेकेदारांनी तात्काळ मध्यस्थी करत दोन्ही पक्षांना वेगळे केले आणि मोठा अनर्थ टाळला. पण घटना CCTV मध्ये कैद झालीच.

प्रकरण पोलिसांत

कार्यालयातील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार तेथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. मात्र, पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षांमध्ये बऱ्याच वेळ चाललेल्या दीर्घ चर्चेनंतर परस्पर सामंजस्याने तडजोड झाली आणि प्रकरण शांत करण्यात आले.

अधिकारी – ठेकेदारांमधील संघर्ष

वर्धा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्यातील वाद नवीन नाही. मागील काही वर्षांपासून हा विभाग विविध भ्रष्टाचाराचे आरोप आणि वादांमुळे सातत्याने चर्चेत राहिला आहे. ठेकेदारांच्या थकीत बिलांच्या मंजुरीसाठी आणि देयकांच्या भुगतानासाठी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी पैशांची मागणी करतात, असा गंभीर आरोप ठेकेदारांकडून वारंवार केला जात आहे. यापूर्वी याच त्रासाला कंटाळून एका ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची अत्यंत गंभीर घटना घडली होती. बुधवारी झालेला वादही याच थकीत बिले आणि कमिशनच्या वादातून उद्भवल्याचे सूत्रांकडून समजते.
कार्यालयीन वेळेत आणि शासकीय परिसरात जबाबदार अधिकारी व ठेकेदाराने अशा प्रकारे रस्त्यावरची मारहाण केल्यामुळे नागरिकांमधून व प्रशासकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.