वर्धा : नगर पालिका निवडणूक हे आपले क्षेत्र नव्हे, असे म्हणणारे म्हणजे प्रामुख्याने पांढरपेशा वर्गातील असतात. कारण नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी साम, दंड, भेद अश्या साधनाचा सरसकट वापर होतो. मारपीट ठरलेली. दबाव, धाक, धमक्या देत ही निवडणूक अनेक भागात होत असल्याचे बहुतांश शहरातील चित्र बघायला मिळते. पैसा उधळला जातोच. त्यामुळे अशा भागात पोलिसांची विशेष कुमक तैनात केल्या जात असते. त्यास संवेदनशील परिसर म्हणून निवडणूक प्रशासन घोषित करते. वर्धा शहरात रामनगर हा असाच बाहुबली नगरपित्यांचा परिसर म्हणून मान्यताप्राप्त परिसर आहे.
रामनगर परिसरासाठी शासनाने निवडणुकीपूर्वी एक आदेश काढून सुखद धक्का दिला. या भागातील बहुतांश घरे लिज पट्ट्यावर वसलेली आहेत. त्याची मालकी मिळावी म्हणून नागरिकांचा अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. त्यास यश आले. या नागरिकांना त्यांच्या राहत्या घराचा मालकी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हा परिसर आनंदी आहे. याच परिसरात अनेक दशकापासून दोन ठाकूर गटाचे वर्चस्व राहल्याचे वर्धा शहराने पाहले.
आता हा परिसर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार. काळे ठाकूर व गोरे ठाकूर यांचे वर्चस्व असलेल्या भागातून यावेळी नगराध्यक्षपदाची उमेदवारी येण्याची चर्चा सूरू आहे. काळे ठाकूर गटाने नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करीत नागराध्यक्ष पदासाठी दावेदारी केली. तर गोरे ठाकूर गट भाजपतर्फे उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे. या दोन्ही कुटुंबातून यापूर्वी विविध व्यक्ती नगरसेवक म्हणून निवडून आल्याचा इतिहास आहे.
विविध पक्षाच्या राजकीय मांडवात त्यांना स्थान पण मिळाले. सत्तेसोबत राहून प्रभाव कायम राखण्यात त्यांना यश मिळाले. त्या प्रभावाचा उपयोग त्यांनी प्रभागाचा विकास करण्यासाठी कुशल उपयोग पण केला. आज वर्धा शहरातील सर्वात स्वच्छ व सुंदर प्रभाग म्हणून ते ओळखल्या जातात. रस्ते, नाल्या, बगीचे, जिम, सफाई यात हे प्रभाग अव्वल आहेत कारण बाहुबली नेत्यांचा प्रभाव.
आता हे दोन्ही गट थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रिंगणात दाखल होण्याच्या तयारीत आहेत. भाजपतर्फे गोरे ठाकूर गटाने उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार मोर्चेबांधणी सूरू केली आहे. अनेक वर्षांपासून शहराची सेवा केली. परिसरात विविध योजना राबवून लोकांची कामे अडू दिली नाही. परिसरात हाणामाऱ्या होवू दिल्या नाही. आम्हास हे पद कां मिळू नये, असा गटाचा सवाल पक्ष नेत्यांना आहे.
तर काळे ठाकूर गटातून पण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस पक्षात या गटाने नुकताच प्रवेश करीत आपला मानस व्यक्त करून टाकला आहे. या गटात पण अनेक नगरसेवक राहून चुकले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष या गोरे व काळे ठाकूर यांच्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.अल्पसंख्यांक म्हणून आमदार खासदारकीसाठी विचार केल्या जात नाही. किमान नगराध्यक्षपदासाठी तरी विचार व्हावा, अशी भावना दोन्ही गट व्यक्त करतात.
