वर्धा: समृद्धी अर्थात बाळासाहेब ठाकरे महामार्ग हा विविध सुविधा यापेक्षा अन्य कारणांनी जरा जास्त चर्चेत येत राहला आहे. खरं तर हा मार्ग शेतकरी व अन्य व्यावसायिक यांना मुंबईस जलदगतीने पोहचविणार व येथील जिन्नस चढ्या भावाने मुंबईत विकल्या जाणार, असे स्वप्न मांडल्या गेले होते. पण आता विविध अपघात, जळणाऱ्या बसेस, दगडफेक, थांब्यावर लूटमार अश्या घडामोडी अधिक चर्चेत आहेत.
प्राणी मृत्यू
या समृद्धी ( Samrudhi ) मार्गावर आता लगतच्या जंगलातील प्राणी फिरायला लागले आणि वाहनाच्या धडकेत बळी जायला लागल्याचे दिसून येत आहे. आज पाहाटे एक बिबट असाच ठार झाला. समृद्धी मार्गावर तो भटकला आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला आहे. दिग्रस वनवृत्त हे याच मार्गावर येते. याच ठिकाणी बिबट एका धडकेत ठार झाल्याची माहिती पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस वाहनाने वन खात्यास दिली. वन अधिकारी चमुने मृतदेह ताब्यात घेतला. आज दुपारी त्यावर पुढील सोपस्कार करण्याचे ठरले.
अंतिम विधी
वर्धा वन खात्याने मृत बिबट ताब्यात घेतला. पंचनामा तपासला. पुढील कार्यवाही करण्यासाठी वन गुन्हा दाखल करण्यात आला. वन कार्यालय परिसरातील शव विच्छेदन करण्यात येत काही तपासणी करण्यासाठी रक्त व अन्य नमुने घेण्यात आले. नंतर मार्गदर्शक निकषावर अग्नी दहन करण्यात आले. ही बाब वन खात्यासाठी एक आव्हान ठरली आहे. हा समृद्धी मार्ग वर्धा व सेलू वन विभागास लागून आहे . या दोन्ही वन क्षेत्रात असंख्य प्राणी फिरत असतात. या प्राण्यांसाठी समृद्धीवर अंडरपास असल्याचे सांगण्यात येते. पण प्राणी या मार्गावर येतात आणि अपघातात मृत होतात, असे चित्र आहे.
कारवाई करणारी चमू.
बिबट समृद्धी मार्गावर मृत अवस्थेत आढळला, हे कळताच वन यंत्रणा कामात लागली. सहाय्यक वनसंरक्षक ए के आडे तसेच वन अधिकारी वैशाली भलावी, ए एल जाधव, वन रक्षक एम एस माने, ए जे गीते, एस सी तांबडे ही चमू उपवनसरक्षक हरवीर सिंग यांच्या मार्गदर्शनात करीत आहे. स्वयंसेवी संस्थेचे आशीष गोस्वामी, कौशल मिश्र, अभिषेक खेडुलकर आणि पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. व्हि. डि. मडावी, प्रणिता पाणतावणे, हर्षा अंधारे यांनी या मृत बिबट प्रकरणात विविध जबाबदारी पार पाडली.
