वर्धा : अलिकडच्या काळात विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देण्याचा विचार युवकांत बळावत असल्याचे दिसून येते. सर्पमित्र हे अशातीलच एक. घरात साप निघाला की तारांबळ उडते. भीतीने पळापळ सुरू होते कारण सापाला पकडणार कोण, अशी समस्या असते. ती दूर करण्यासाठी अंनिस व अन्य पशुप्रेमी संघटनांनी साप पकडण्याचे प्रशिक्षण देणे सुरू केले. त्यातून अनेक हौशी युवक तयार झाले. एक तर घरच्या लोकांची भीती दूर करणे तसेच सापाला न मारता सुरक्षित ठेवण्याचा हेतू. मात्र आता हे सर्पमित्र पण या कलेचा व्यापार तर करीत नाही ना, अशी साधार भीती दिसली.

आर्वी शहरात एका सर्पमित्राने पकडलेला साप एका घरात सोडला. विठ्ठल वॉर्ड येथील राहणारे व्यापारी संघाचे सचिव अनिल ज्येठानंद लालवानी यांचा किराणा मालाचा व्यवसाय आहे. रात्रीच्या सुमारास त्यांच्या कुटुंबातील एक महिला घराबाहेर फिरत होती. तेव्हाच एका युवकाने लालवणी यांच्या घरात प्लास्टिकच्या डब्यात आणलेला साप सोडून दिला. ही बाब महिलांच्या तसेच बाजूला बसून एका युवकांच्या लक्षात आली. हा प्रकार माहित होताच आरडा ओरड सुरू झाली. अनिल व शिवम लालवानी यांनी मिळून साप घरात सोडणाऱ्या युवकास पकडले. तेव्हा तो सर्पमित्र चेतन विलायतकर असल्याचे दिसून आले. त्याची खडसावून विचारपूस करण्यात आली. मात्र त्याने सर्व टोलवून लावले. मात्र त्यानेच घरात साप सोडण्याचा प्रकार केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हे असे कां, अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा यापूर्वी एक घटना घडली होती. लालवानी यांच्याच घरातील स्वयंपाकघरात साप निघाला होता. तेव्हा कल्ला झाल्याने चेतन विलायतकर हाच धावून आला व सर्पमित्र असल्याचे सांगत त्याने साप पकडला होता. त्याबद्दल चेतन यांस लालवानी कुटुंबाने दोनशे रुपयाचे बक्षीस दिले होते. म्हणून त्याने बक्षीसासाठी तर परत हा फंडा वापरला नसावा, अशी चर्चा होत आहे.

हेही वाचा…शासकीय कामांना लाचेची कीड; पश्चिम विदर्भात लाचखोरीची ‘पन्नाशी’; पैसे दिल्याशिवाय…

तर दुसऱ्या एका घटनेत सर्पमित्र युवकांनी आर्वीतच एका दुर्मिळ सापास पकडून त्यास सुरक्षित सोडण्याची कामगिरी केली. येथील अमित पिचकर यांच्या शेतात दुर्मिळ साप असल्याची माहिती गरुडझेप संस्थेचे पवन मरसकोल्हे यांना समजली. हा साप अंडेखाऊ भारतीय साप असल्याचे दिसून आले. तिथे सर्पमित्र मंडळी जमा झाली. त्यांनी सापास पकडून वन खात्याकडे नोंद केली. नंतर नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.