वर्धा : सध्या राज्यात मुली, महिला यांच्यावरील अत्याचार गाजत आहे. विविध प्रकारे निषेध व संताप नोंदविल्या जात आहे. ठिकठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. समाज माध्यमावर टोमणे मारल्या जात आहेच पण तसे फोटो पण दिसून येत आहे. व्यंगचित्रवजा असेच एक चित्रही व्हायरल होत आहे.
मात्र, त्याची आगळीवेगळी नोंद एका शाळेच्या मुलींनी घेतल्याचे दिसून आले आहे. कारंजा घाडगे तालुक्यातील कस्तुरबा शाळेतील मुलींनी एक परिचित चित्र थेट शाळेच्या फलकावर काढून भावना व्यक्त केल्यात. लाडकी बहीण ही सध्याची सर्वाधिक चर्चित योजना आहे. त्याचा दाखला देत आईला तर १५०० रुपये दिलेत मामा पण माझ्या सुरक्षेचे काय ? असा अंतर्मुख करणारा सवाल या चित्रातून मुलींनी केला. त्यांना मदत व मार्गदर्शन शाळा शिक्षक प्रकाश निखारे यांनी केले. ते म्हणतात हे खडूने रेखाटलेले चित्र संदेशात्मक आहे.
हेही वाचा…वर्धा : महिला होमगार्डला पोलिसांची बेदम मारहाण, हात मोडला
कुणाला दुखवायचे नाही, ना कुणाला टोमणा मारायचा आहे. त्याची दखल समाजाने घेऊन विचार करावा, असे निखारे सर म्हणतात. यापूर्वी पण प्रबोधनपर चित्र शाळा फलकावर काढली असल्याचे ते सांगतात. यात मोनाली बारंगे, श्रावणी बोरवार,नेहा चौधरी,पुनम चांदूरकर, जान्हवी फरकाडे,चैताली घागरे, भक्ती काळे,सोनम परतेती या विद्यार्थिनींनी मदत केली आहे.
मात्र थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणारे हे बोलके चित्र एकप्रकारे सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर वार करीत आहे. मुख्यमंत्र्यांचा चेहरा स्पष्ट चितारला आहे. आता सत्ताधारी हे भाष्य कोणत्या अंगाने घेते ते बघावे लागेल, अशी प्रतिक्रिया येते. चित्र समाज माध्यमावर चांगलेच व्हायरल होत आहे.
हेही वाचा…अमरावती-नागपूर महामार्गावर एसटी बस उलटली; एक जण ठार, २८ प्रवासी जखमी
सरकार व विरोधी पक्ष सध्या लाडकी बहीण योजनेचे समर्थन व विरोध करण्यात आघाडीवर आहे. ही योजना गरीब भगिनींना सहाय्य करणारी असून सत्तेवर पुन्हा आल्यास रक्कम दुप्पट करू, अशी हमी खुद्द मुख्यमंत्री देत आहे.
हेही वाचा…नागपूर : आई- मुलाची एकाचवेळी विक्रमी झेप
तर पैसे कुठून आणणार, असा सवाल विरोधी पक्ष करीत आहे. त्याच वेळी राज्यात ठिकठिकाणी मुली व महिलांवरील अत्याचारच्या एका पाठोपाठ एक घटना उघड होत आहे. राजकीय पातळीवर टिकेची झोड उठली असतांना जिल्ह्याच्या एका टोकावरील ग्रामीण भागातल्या शाळेत भावना बोलकी झाली आहे. हे चित्र सर्वांना आरसा दाखविणारे असल्याचे म्हटल्या जाते.