वर्धा : एखाद्या कार्यक्रमाचा हेतू कितीही उदात्त असो, पण तो कार्यक्रम जर उद्दिष्टनुसार अंमलात येत नसेल तर फज्जा उडणारच. जिल्ह्यातील दारूबंदी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस सर्व ते प्रयत्न करतात. रोज लाखोंची दारू पकडल्या जाते. पण आश्चर्य म्हणजे तेवढीच उपलब्ध पण होते. आता तर खुलेआम दारुविक्रीचे फलक दिसू लागले आहे. पण कारण ?

अवैध विक्री

सेलू तालुक्यात अवैध दारूविक्रीने सीमा गाठली असून, याविरोधात पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा ठपका ठेवत नागरिक तीव्र असंतोष व्यक्त करीत आहे. काही दिवसांपूर्वी ‘वाहितपूर’ येथे गावकऱ्यांनी अनोखा फलक लावून प्रशासनाचा निषेध केला होता. आता तसाच प्रकार ‘बोरी (कोकाटे)’ या गावातही पाहायला मिळत आहे. गावातील ‘माँ दुर्गा दारूबंदी महिला मंडळाने’ गावात २४ तास दारू उपलब्ध असल्याचा उपरोधिक फलक लावून सेलू पोलिसांच्या निष्क्रियतेचे वाभाडे काढले आहेत. महिलांनी मुख्यमंत्र्यांपासून ते अधीक्षकांपर्यंत धाव घेतली पण कारवाई शून्य असल्याची टीका होते.

महिला आक्रमक

बोरी (कोकाटे) येथील महिलांनी गावात दारूबंदी व्हावी म्हणून मोठा संघर्ष सुरू केला आहे. यासाठी ‘माँ दुर्गा दारूबंदी महिला मंडळाने’ सेलू पोलीस ठाण्यापासून ते थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत अनेकदा निवेदने दिली. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनीही या निवेदनाची गंभीर दखल घेत पोलिसांना रीतसर पत्रव्यवहार केला होता. एवढेच नव्हे तर, जीवाची पर्वा न करता महिलांनी अवैध धंदेवाल्यांविरोधात आवाज उठवला. गावात जेव्हा पोलीस आले, तेव्हा महिलांनी स्वतः पुढे होऊन दारू विकणाऱ्यांची घरे दाखवून दिली. मात्र, एवढे सगळे करूनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. पोलिसांच्या या हतबल आणि संशयास्पद भूमिकेमुळे संतप्त झालेल्या महिलांनी शेवटी गावात फलक लावण्याचा निर्णय घेतला.

दूध ५० , दारू १५० रुपये

या फलकाची गावात चर्चा सूरू झाली आहे. हा दर दर्शक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.महिलांनी गावात लावलेला फलक सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या फलकावर गावातील वास्तव मांडताना लिहिले आहे की आमच्या गावात दूध सकाळी एक तास ५० रुपये लिटर दराने मिळते, तर दारू २४ तास १५० रुपये लिटर दराने मिळते!या उपरोधिक फलकाच्या माध्यमातून महिलांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवला आहे. दारूमुळे चौघांचा मृत्यू, अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचे गावकरी सांगतात.

गावठी दारू

बोरी (कोकाटे) हे गाव बोरधरण परिसराला लागून असून हा परिसर गावठी दारूच्या भट्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात अवैध दारू विक्रीला प्रचंड ऊत आला असून रात्रंदिवस मद्यपींची गर्दी असते. धक्कादायक बाब म्हणजे, प्राथमिक शाळा आणि आरोग्य उपकेंद्राच्या अगदी जवळच गावठी मोहाची व विदेशी दारू उघडपणे विकली जाते. या दारूच्या विळख्यामुळे गावात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांचे हसते-खेळते संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याने मुलांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत.
महिला आणि कार्यकर्त्यांचा लढा सुरू झाला आहे.

दुर्गा मंडळ

दारूच्या या भयंकर परिस्थितीला कंटाळून माँ दुर्गा दारूबंदी महिला मंडळाच्या प्रमिला वाघाडे, मंगला पाटील, अर्चना खोब्रागडे, कांता नेहारे, चंद्रकला सरमाके, सुमन राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना गावातील सामाजिक कार्यकर्ते गोविंदा पेटकर, सौरभ कोवार, प्रकाश सरमाके आणि सुजल कोडापे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. महिलांनी कमरेला पदर खोचून अवैध दारूविक्रेत्यांविरोधात लढा पुकारला असला, तरी पोलीस यंत्रणेची साथ मिळत नसल्याने त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. या फलकानंतर तरी पोलीस प्रशासनाला जाग येणार की अवैध दारूचा हा नंगानाच असाच सुरू राहणार, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.