वर्धा : तिकडे दूरदेशी २०११ साली ओसामा बिन लादेन कुख्यात दहशतवादी मारल्या गेला आणि इकडे त्याच्या नावाने झोपडपट्टी विस्तारत गेली. मध्यरेल्वे मार्गावर. पण छोटेखानी शहर असलेले गाव भटक्या लोकांचे आश्रयस्थान बनले. हळूहळू बांगलादेशी फकीर बनून आले. मग त्यांचे आप्त असा झोपडपट्टी विस्तार झाला. मात्र संख्या ४००, ५०० च्या घरात गेली आणि उपद्रव वाढला. सिंदी रेल्वे या तान्हा पोळ्यासाठी विदर्भात प्रसिद्ध असलेल्या गावाची ही कथा. काहींनी मग रहिवासी दाखलाही प्राप्त करून घेतला. ५० रुपयात एक, दोन तत्कालीन नगरसेवकांनी यात हात धुवून घेतले.

मात्र ही वसाहत गावाची पिडा ठरत गेल्यावर त्याविरोधात रोष वाढत जावू लागला. अनेकवार ही अवैध वसाहत हटवावी म्हणून निवेदने गेली. पण सर्व ढिम्म. या ठिकाणी कुख्यात आरोपी लपून बसतात, असे पण सांगण्यात आले. यातील काही गावात बळजोरी करीत. भिक्षा नं दिल्यास शिवीगाळ करायचे. भुरट्या चोऱ्या सुरूच. काहींचे व्यसन जगवेगळे. पंचर दुरुस्त करायचा मलम, शाईचे थिनर कपड्यावर टाकून हुंगणार. त्याची नशा आणि मग ओरड, अशी माहिती गावकरी देतात.

अखेर ही वसाहत वन जमिनीवर अनधिकृतपणे वसली असल्याचा ठपका ठेवत ती तोडणे सूरू झाले. वन व महसूलचे ४०० अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून सिंदी रेल्वे येथील मौजा परसोडी शिवारात वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करुन कच्चे व पक्के घराचे बांधकाम केले होते. वन विभागाने पोलिस विभागाच्या मदतीने कायदेशिर कार्यवाही करुन येथील घराचे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया शांततेत पूर्ण केली. सहाय्यक वनसंरक्षक हरीलाल सरोदे व माधव आडे यांच्या मार्गदर्शनात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी तसेच अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वात पोलिस विभागाच्या ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता.सेलूच्या तहसिलदार शंकुतला पाराजे, सिंदीचे नायब तहसिलदार यांची उपस्थिती होती.

माजी नगराध्यक्ष व सिंदी शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रकाशचंद्र डफ सांगतात की अनेक वर्षांपासून सिंदीकर संतप्त होते. त्याची दखल प्रशासनास घ्यावी लागली. या लोकांना रहिवासी दाखला व अन्य कागदपत्रे मिळवून देणाऱ्या लोकांची पण आता चौकशी झाली पाहिजे. पुन्हा ही झोपडपट्टी उभी राहू नये म्हणून प्रशासनाने दक्षता घ्यावी. करोना काळात तर यांच्यासाठी परप्रांतातून ट्रकने जिन्नस येत होता. काही अडविले होते. पण शिधा जावू द्या, अन्यथा हे अन्य वाईट प्रकार करतील, असे मीच सुचविले होते. पण आता त्यांचा त्रास अधिकच वाढत चालला होता. २००० सालापासून हे अतिक्रमन सूरू झाले होते. कुख्यात लादेन मारला गेला, तेव्हा लादेननगर म्हणून ही वसाहत ओळखल्या जावू लागली.