वर्धा : अपघातात शिक्षिका नरांजे यांचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. खुद्द जिल्हाधिकारी वान्मथी चंद्रशेखर यांनी लोकसत्ता ऑनलाईन बातमीची दखल घेतली. त्याची नोंद घेत हिंगणघाट SDO यांनी घेत लोकसत्तास खुलासा केला की हे SIR प्रशिक्षण नव्हते. आम्ही चौकशी करीत आहो.

शिक्षक नेते म्हणतात

प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेने याबाबत निवेदन देत स्पष्ट भूमिका घेतली. संघटना नेते विजय कोंबे म्हणतात की दि. ३० जुलै २०२६ रोजी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देतानाच वर्धा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या इशाऱ्याकडे पाहून आवश्यक शालेय कामकाजाच्या संबंधाने आवश्यक निर्देश देणे गरजेचे होते. जिल्ह्यातील अनेक शाळा सखल भागात असल्याने त्या ठिकाणी पाणी साचते. अनेक विद्यार्थी परगावाहून जाणे येणे करतात. अनेक शाळांच्या इमारती नादुरुस्त असल्याने पाणी गळते व परिसरात पाणी तुंबून राहते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आजच्या दिवशी आवश्यक सुरक्षिततेच्या उपाय योजनेसाठी सूचना निर्गत होणे नितांत आवश्यक होते.

शिक्षक आधीच व्यस्त

अनेक शिक्षक SIR कामात व्यस्त आहेत. काही तहसील कार्यालयात तर आज शिक्षकांना सकाळपासूनच उपस्थित राहण्याचे आदेश असून रात्रीचे जेवणाचे डबे घेऊन सुद्धां बोलावल्याचे कळते. अर्थात हे BLO म्हणून नियुक्त शिक्षक आज (३० जुलै) शाळेत उपस्थित राहणे शक्यच नव्हते. अशाही परिस्थितीत शाळेतील उपस्थित शिक्षकांचा विचार न करता हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्ट कडे दुर्लक्ष करून आज आणि उद्या जिल्हा परिषदेच्या अनेक समूह साधन केंद्रांमध्ये शिक्षण परिषदा आयोजित केल्या आहेत. प्रामुख्याने या शिक्षण परिषदा खेडेगावात आयोजित केल्या आहेत. पावसात काही खेडेगावात जाण्या-येण्याची अत्यंत शोचनीय स्थिती असते. SIR च्या कामामुळे काही शिक्षक शिक्षण परिषदेला उपस्थित राहणार नाहीत आणि ऑरेंज अलर्ट असताना शिक्षण परिषद आयोजित करण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नाही. या प्रकारची परिस्थिती होती.

शिक्षकांना वेठीस धरले

शिक्षक बंधू भगिनी यांना वेठीस धरण्यात आले. धरण्याच्या भूमिकेमुळे हिंगणघाट येथील अपघात आणि त्यात मृत्यू झाला असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, शाळेतील शिक्षकांची संख्या, अतिवृष्टीच्या अनुषंगाने शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांचे सुरक्षित घरी जाणे हे प्राधान्याचे असताना अशा प्रकारच्या शैक्षणिक परिषदा आयोजित करणे अनाकलनीय व अप्रस्तुत आहे. करीता या संबंधाने अत्यावश्यक असे निर्देश सर्व संबंधितांना देऊन सदर बाबतीत आवश्यक कारवाई व्हावी. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सोमण हे म्हणतात की मी सध्या रजेवर आहे. पण शिक्षणाधिकारी यांना सूचना करीत चौकशी करा असे सांगितले.