वर्धा : विशेष सखोल निरीक्षण आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम त्वरित पुर्ण व्हावे यासाठी प्रशासन घाई करीत असल्याचे म्हटल्या जाते. या कामाचा ताण प्रामुख्याने शिक्षक वर्गावर असल्याची ओरड शिक्षक संघटना करतात. त्या कामाचा ताण आणि परत शाळेत हजेरी अशी तारांबळ उडत असल्याचे दिसून येते. आज एका शिक्षिकेचा झालेला मृत्यू त्याचाच परिणाम असल्याचे म्हटल्या जात आहे.

शिक्षिकेचा दुर्दैवी अंत

शासकीय कामांचा वाढता अतिरिक्त ताण आणि प्रशासनाच्या अवाजवी अटींमुळे एका कर्तबगार शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक व संतापजनक घटना हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग १४४ वर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील पुलावर घडली आहे. सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका जोत्स्ना खेमनाद रामटेके (जोत्स्ना गिरीश नरांजे, रा. हिंगणघाट) यांचा मोपेड गाडीने ट्रेनिंगला जात असताना झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी आतापर्यंत पाच ते सहा अपघाताच्या घटना घडल्या असून अनेकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. तरी प्रशासन कुंभकरणाच्या निद्रेत आहे या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​पावसाचा ऑरेंज अलर्ट

​मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. असे असतानाही प्रशासनाने शिक्षकांना दुपारी २ वाजेपर्यंत आपली नियमित शाळा पूर्ण करून शासनाने आयोजित केलेल्या एसआयआर (SIR) ट्रेनिंगला उपस्थित राहणे सक्तीचे केले होते. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण एखाद्या मोठ्या शहरात वा सोयीच्या ठिकाणी आयोजित न करता चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात ठेवण्यात आले होते.
​हवामानाची प्रतिकूल परिस्थिती आणि मुसळधार पाऊस सुरू असतानाही ‘वेळेवर हजर राहणे बंधनकारक’ असल्याच्या प्रशासकीय दबावापोटी ज्योत्स्ना नरांजे या दुपारी २ वाजता शाळा आटोपून आपल्या मोपेड (दुचाकी) वाहनाने हिंगणघाटवरून चिंचोलीकडे जाण्यासाठी निघाल्या.​हिंगणघाट सोडल्यानंतर हायवेवर मुसळधार पावसात त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ज्योत्स्ना नरांजे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

​नेमका दोष कोणाचा?

​ज्योत्स्ना नरांजे यांच्या अचानक जाण्याने त्यांचा हसता-खेळता परिवार पूर्णपणे उघड्यावर पडला आहे. शासनाने आणि शिक्षण विभागाने शिक्षकांना नेमकी कामे द्यावी तरी किती, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. ​जिल्ह्यात निसर्गाचा कोप आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही शिक्षकांना सक्तीने प्रवासाला भाग पाडणाऱ्या प्रशासकीय निर्णयावर आता तीव्र ताशेरे ओढले जात आहेत. हा अपघात नसून प्रशासनाच्या अवाजवी अटी आणि अतिरिक्त कामाच्या ताणामुळे घेतलेला बळी आहे, असा थेट आरोप मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी व स्थानिक शिक्षकांनी केला आहे. ​या दुर्दैवी घटनेमुळे शिक्षकांवरील बिन-शिक्षण कामांचा ताण आणि आपत्कालीन स्थितीत प्रशासनाकडून होणारी सक्ती पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

शिक्षक नेते म्हणतात…

प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे म्हणतात की, शालेय जबाबदारी सांभाळून प्रशिक्षणासाठी जाण्याची घाई, कमी शिक्षक आणि जबाबदाऱ्या अनेक अशी शिक्षकांची स्थिती आहे. अत्यंत तणावात शिक्षक काम करत आहे. त्यातूनच अशा दुर्दैवी घटना घडत आहे. शिक्षकांच्या जीवाचा विचार करून शासनाने अतिरिक्त शिक्षणेतर कामे बंद केली पाहिजेत.