वर्धा : वन परिसंस्थेत वाघ अग्रस्थानी. त्याची भ्रमंती ही सुदृढ वन संपदेची पावती समजल्या जाते. पण आता तर आपल्या डरकाळ्यांनी आसमंत गाजविणाऱ्या व झुंडीने दिसणाऱ्या व्याघ्र कुटुंबाने एक परिसर हादरून गेला आहे. ७० वन कर्मचारी – अधिकारी या कुटुंबाचा मागोवा घेत आहे. बरं, पकडता पण येत नाही. कारण नियम आडवा येतो. दिसला रे दिसला, वाघ दिसला. आला रे आला वाघ आला. या चर्चा आर्वी पंचक्रोशीत सध्या सुरू आहे. एका शेतकऱ्याचा जीव वाघाच्या हल्ल्यात गेला आणि भीतीने शिखर गाठले.
इतके वाघ कसे?
आर्वी क्षेत्रातील तळेगाव व आष्टी परिसरात या वाघांच्या टोळीने हैदोस घातला आहे. मानवी रक्त चाखलेली एक वाघीण. आणि दुसरी एक वाघीण व तिचे वयात येत असलेले तीन बच्चमजी. हे भक्ष्य ( kill ) करीत आहे. गायी, वासरे बळी पडली. आता तर रस्त्यावर त्यांचा वावर दिसू लागला आहे. वाघीणीने तळेगाव परिसरात हल्ले केले. १७ ऑगस्ट रोजी तिच्या हल्ल्यात शेतकरी बळी गेला. त्यानंतर ती दिसेनाशी झाली. मात्र २७ ऑगस्ट रोजी परत एक हल्ला झाला आणि ती चर्चेत आली.
आता मोर्चा अमरावतीकडे
ही हल्लेखोर वाघीण आता मोर्शीच्या दिशेने गेल्याच्या पाऊलखुणा सापडल्याचे वनक्षेत्र अधिकारी सांगतात. २७ ऑगस्ट रोजी झालेला हल्ला हा अमरावती वनक्षेत्रात दिसून आला आहे. त्यामुळे वर्धा वन खाते आता व्याघ्र कुटुंबाकडे वळले. थार, पोरगव्हाण, चामला या परिसरात रात्री व दिवसा पण वाघीण व उधम करणारे तिचे ३ बच्चे संचार करीत आहे. त्यांनी अद्याप कुठे कोणावर हल्ला केलेला नाही. साधारणपणे वाघ १० दिवसाच्या अंतराने किल करतात, असे वन अधिकारी सांगतात. पण ईथे बच्चे कंपनी हैदोस करीत आहे. हे खाऊ की ते, असा द्वाडपणा त्यांनी चालविला आहे. १४ ते १८ महिन्याचे हे म्हणायलाच बच्चे. पण तारुण्यातील धिंगा घालत आहे.
पकडता येत नाही
बरं, गावकरी त्रस्त म्हणुन त्यास पकडणे आवश्यक. तसे निवेदन वन खात्यास गेले. पण पकडायची सोय नाही. कारण ? त्यांच्याच घरात ते आहे. म्हणजे अधिवास असलेल्या जंगल क्षेत्रात ते असल्याने त्यांना पकडण्याचे आदेश देता येत नाही. पेंच ते मेळघाट व्हाया आर्वी असा हा वाघांचा राजमार्ग ( Corridor ) आहे. हल्लेखोर वाघीण ही याच मार्गे मेळघाट दिशेने गेल्याचा अंदाज बांधल्या जातो. आता वाघीण व तिचे कुटुंब आपल्याच अधिवासात असून त्यांनी गाव क्षेत्रात हल्ला केलेला नाही. परिणामी त्यांची टेहळणी करण्याचे काम सूरू आहे. या व्हिडिओत वाघीण व बच्चे रात्रीच्या गस्तीत आढळून आले असल्याचे म्हटल्या जाते.थरकाप उडावा, असा हा व्हिडीओ.
आमदारांनी दिला दिलासा
आर्वी क्षेत्रातील नरसिंगपूर येथील शेतात दिनांक १७ ऑगस्ट रोजी नागपंचमीची पूजा करण्यासाठी शेतामध्ये गेले असतांना वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या स्व. रामभाऊ उदयभानजी भोयर यांच्या कुटुंबीयांची आमदार सुमित वानखेडे यांनी भेट घेतली. भेट घेऊन या दुःखद घटनेनंतर मंजूर शासकीय मदत १० लक्ष रुपये त्यांच्या कुटुंबीयांकडे धनादेशाच्या स्वरूपात सुपूर्द केले. भाजप आष्टी तालुका अध्यक्ष अंकिताताई होले, वनपरिक्षेत्र अधिकारी लांबाडे,अशोक विजयकर, ॲड.मनीष ठोंबरे, विलास चोहटकर, नरेंद्र भेनारकर व अन्य उपस्थित होते. यावेळी हल्लेखोर वाघीणीचा बंदोबस्त करण्याची खात्री देण्यात आली.
