वर्धा : सेलू तालुक्यातील रायपूर जंगली या गावात ९ सप्टेंबरला भगवान चंद्रभान धुर्वे या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सायंकाळी ही घटना उजेडात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यास गावात पाठविण्यात आले अंत्य संस्कारासाठी मदत म्हणुन शासनाचे २५ हजार रुपये पीडित कुटुंबाने स्वीकारले.मात्र नंतर पीडित कुटुंबातील एकास नौकरी व १ कोटी रुपये नुकसानभरपाई अशी मागणी गावाकऱ्यांनी रेटून धरली. म्हणुन मग मृतदेह परत सेलू रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यास आता ८४ तास होत आहे. या दरम्यान मृतदेह २ वेळा बाह्य वातावरणात आला आणि धोका वाढला, असे सांगण्यात आले.
अनेक मागण्या झाल्या
गावकरी या घटनेने संतप्त झाल्याचे दिसून आल्यावर जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी गावाकऱ्यांना भेटून मागण्या समजून घेतल्या. व्याघ्र प्रकल्प परिसरात येणाऱ्या या गावास अशी आपत्ती नेहमी सोसावी लागते. बंदोबस्त होत नाही. हा मृत्यू गावात संताप निर्माण करणारा ठरत आहे, असे स्पष्ट करीत गावाकऱ्यांनी आंदोलन सूरू केले. वर्ध्यात पण खा. अमर काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.
शासनाची भूमिका जाहीर
एकीकडे आंदोलन सूरू असतांना दुसरीकडे शासनाने या संदर्भात होणारी कार्यवाही जाहीर केली आहे. त्यानुसार मृत व्यक्तीच्या वारसांना शासन नियमांनुसार नुकसानभरपाईचा मोबदला लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. सदर वाघास तातडीने पकडण्यासोबतच अशी घटना घडू नये यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे व गस्त वाढविण्यात आली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांच्या मागण्यांच्या अनुषंगाने बोर व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. वाघाचा मागोवा घेण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून, वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रस्ताव तयार करून मुख्य वन्यजीव रक्षक नागपूर यांची परवानगी घेण्यात येत आहे. तसेच परिसरातील वन विभागाची गस्त वाढविण्यात आली आहे. मृतकाच्या कुटुंबातील एकास सफारी गाडी विशेष योजनेतून देण्यात येणार.
आज शासन म्हणते…
आज जिल्हाधिकारी वान्मथी सी. तसेच पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील बेले व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनाची भूमिका मांडली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निर्देश आहेत की मृतदेहाची विटंबना होवू नये. त्याचा पण सन्मान राखल्या जावा, अशी माहिती देत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की आयोगाचे सांगणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याअंती आले आहेत. या प्रकरणात मृतदेह शवागारात ठेवून बराच कालावधी लोटला आहे. म्हणुन गावकऱ्यांना आम्ही अंत्य संस्कार लवकर करण्याची विनंती केली आहे. डॉ. बेले म्हणाले की मृतदेह ठराविक काळच सुरक्षित ठेवता येतो. त्यानंतर विघटन प्रक्रिया सूरू होते. ही बाब संवेदनशील आहे. तर बोर व्याघ्र प्रकल्पचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी नमूद केले की गावाकऱ्यांची मागणी आम्ही वरिष्ठ पातळीवर मांडली आहे.
अन्य मागण्या
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठा रस्ता उपलब्ध करून देणे, रस्त्यालगतचा व गावालगतचा परिसर स्वच्छ करणे, तसेच वाघ जेरबंद झाल्यानंतर ग्रामस्थांना त्याबाबत माहिती देऊन प्रत्यक्ष दाखविण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. संबंधित नियतक्षेत्रात हंगामी मजूर वाढविण्यात येणार आहे. रायपूर जंगली गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
