वर्धा : उन्हाळा मार्च महिन्याच्या सुरुवातीसच होरपळून काढत आहे. शरीराची आताच लाही लाही सुरू आणि पाणीपुरवठा पडला ठप्प. पाणीपुरवठा नियमित असावा, त्रुटी असतील तर त्या उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच दूर कराव्या, टाकी सफाई, अशी व अन्य पुरवठा संबंधित कामे लक्ष देत पार पाडण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थेची. शहरात नगरपालिकेची. पण वादात ८ दिवस गेले आणि त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागणार.
नेमके झाले काय?
वर्धा शहरास येळकेळी येथील पंपिंग स्टेशनवरून पाणीपुरवठा केल्या जातो. त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाची. पण प्रशासन त्या बाबतीत जबाबदारी घ्यायला तयार नाही. म्हणणे असे की, झालेली चूक आमची नाही. ज्याने केली, त्यानेच दुरुस्त करावी. बसले वाट बघत. यात पुढील संकट शहरातील नागरिकांना सहन करावे लागेल, याचे कोणीच भान ठेवले नाही.
‘समृद्धी’वर खापर
शहरास लागून व येळकेळी पाणीपुरवठा मार्गावर समृद्धी महामार्ग भिडतो. या ठिकाणी मार्गाचा इंटरचेंज आहे.त्यात गोलाकार भागात छोटी बाग फुलविण्याचे समृद्धी महामार्ग प्रशासनाने ठरविले. हे काम करीत असताना पुरवठा वाहिनीस तडे गेले आणि पाणी वाहणे सुरू झाले.
समृद्धी प्रशासन म्हणते…
तडा गेल्याने पाणी वाहू लागले आणि त्याचा विपरीत परिणाम शहरातील पुरवठा्यावर झाला. पण दुरुस्ती करणार कोण, हा वाद रंगला. पालिका प्रशासनाने स्पष्ट केले की ही दुरुस्ती समृद्धी प्रशासनानेच करून दिली पाहिजे. तेच दोषी म्हणून खर्च पण त्यांनीच करावा. समृद्धी त्यास तयार. पण त्यासाठी वरिष्ठ पातळीवर परवानगी घेण्याची त्यांची अडचण. यात ८ दिवस गेले. समृद्धी प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीरून निर्देश येण्यास विलंब म्हणून पाण्याची नासाडी मात्र सुरूच.
आता शेवटी पालिका म्हणते…
८ दिवसापासून पाणी वाया जाणे सूरू पण दुरुस्ती होईच नां. शेवटी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी सामंजस्य दाखवीत हे काम मार्गी लावण्याचे ठरविले. आता काम सूरू करायचे म्हणून मग पाणी पुरवठा बंद करणे आलेच. ते झाले. मग नागरिकांना कोण व कसे सांगणार म्हणून पालिकेच्या पाणी पुरवठा सभापती शुभांगीताई कोलते यांनी फेसबुक गाठले. त्यातून सूचना दिली.
नागरिकांना कळविण्यात येते की येळकेळी येथील पंपिंग स्टेशन येथून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीस तडे गेल्याने पालिकेतर्फे तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. म्हणून गुरवार व शुक्रवार असे दोन दिवस शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहील. दुरुस्ती झाली की नियमित पाणी पुरवठा सुरू होईल. नागरिकांनी सहकार्य करावे व पाण्याचा वापर जपून करावा.
नगराध्यक्ष म्हणतात की..
मंगळवारी रात्री पुरवठा बंद बाबत सूचना आली. याबाबत बोलताना नगराध्यक्ष सुधीर पांगुळ म्हणतात की दोष कुणाचा ही बाब बाजूला ठेवूया. आधी नागरिकांना पाणी नियमित देणे महत्वाचे. ते ध्यानात ठेवून पालिका प्रशासनाने हे दुरुस्ती काम हाती घेतले आहे. खर्च होईल. पण त्याची भरपाई आम्ही समृद्धी मार्ग प्रशासनास मागणार. जनतेचा पैसा जाणार नाही.
