वर्धा : निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन हेच अनेकांच्या उर्वरित जीवनाचा आधार असते. ते मिळणार म्हणून सर्व एक तारखेकडे डोळे लावून बसले असतात. तसेच काही भर त्यात पडणार अशी अपेक्षा ठेवून असतात. भर पडली तर मग फरकाची रक्कम मिळत असते. आता ती मिळवून देतो म्हणून काही भामटे लुबाडणूक करीत असल्याच्या घटना उजेडात येत आहे.

राज्यातील काही कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन अथवा कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शनधारकांना अज्ञात व्यक्तींकडून संपर्क साधल्या जात आहे. आपणास सुधारित निवृत्ती वेतनाची फरक रक्कम मिळणार असून त्याअगोदर तुमची वसुली निघत आहे. ती रक्कम तात्काळ ऑनलाईन भरावी. जेणेकरुन तुमची फरक रक्कम तुम्हास मिळेल, असे हे भामटे फोन करुन सांगतात.या आमिषाला बळी पडून काहींनी अश्या व्यक्तींसोबत व्यवहार केल्याने त्यांची फसवणूक झाली.

हेही वाचा…नागपूर : एमआयडीसीतील प्रिटींग शाई तयार करणाऱ्या कंपनीला आग

अश्या घटना घडू नये म्हणून राज्यात सावधानतेचा ईशारा राज्याच्या निवृत्तीवेतन संचालनालाय येथील उपसंचालक संगीता जोशी यांनी सर्व जिल्हा कोषागार कार्यालयास देत जनजागृती करण्याचे सूचित केले आहे. आता तसे आवाहन करण्यात येत आहे.जिल्हा कोषागाराच्या अधीनस्थ सर्व निवृत्तीवेतन धारकांना आवाहन करण्यात आले आहे की कोषागारमार्फत निवृत्तीवेतन किंवा सुधारित निवृत्तीवेतन तसेच इतर लाभ प्रदान करण्यात येतात.

लाभ देतांना कोणत्याही प्रकारे वसुली बाबत किंवा देण्यात येणाऱ्या रकमेबाबत फोन करुन कार्यालय संपर्क साधत नाही.ऑनलाईन व्यवहार पण होत नाही. कोषागार कार्यालय फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केल्या जात असतो. आता काहींना फोन करुन ऑनलाईन रक्कम भरण्यास सांगितल्या जात असल्याचे प्रकार घडत असून तश्या तक्रारी प्राप्त होत आहे.मात्र कार्यालयातून असा फोन केल्या जात नाही किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्यांस घरी पाठविल्या जात नाही.म्हणून कोणीही अश्या फोनला प्रतिसाद देवू नये.

हेही वाचा…पिस्तुलचा धाक दाखवून शारीरिक संबंधाची मागणी करणे भोवले, ठाणेदार…

फोन आल्यास सूचित करावे.शंका आल्यास कोषागार कार्यालयाशी प्रथम संपर्क करावा. तरीही निवृत्तीवेतनधारकांनी पैसे भरल्यास ती व्यक्तिगत जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी, असे खबरदार केल्या गेले आहे. कोणताही व्यवहार करण्यापुर्वी अथवा शंका आल्यास प्रथम कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा.ऑनलाईन, गूगल पे, फोन पे किंवा अन्य कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून रक्कम भरण्यास सुचविल्या जात नसल्याचे जिल्हा कोषागार कार्यालयाने स्पष्ट केले आहे.