चंद्रपूर : आठवडी बाजारासाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या खासगी भूखंडाचे ६६ लाख रुपये भाडे देण्यास भद्रावती नगर पालिकेने टाळाटाळ केली. जमीन मालकाने वेळोवेळी भाड्याची मागणी करूनही आणि योग्य संधी देऊनही भाडे दिले गेले नाही. अखेर वरोरा न्यायालयात प्रकरण पोहोचले. न्यायालयाने थेट नगर पालिका कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जमीन मालकाने नगर पालिका मुख्याधिकारी यांची खुर्ची व वाहनापासून कार्यालयातील साहित्य जप्त करण्याची कारवाई केली. जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव करून थकलेले भाडे वसुल करण्यात येईल, असे जमीन मालकाकडून सांगण्यात आले.
भद्रावती शहरातील राजु गुंडावार, संजय गुंडावार व किशोर गुंडावार यांची ३० हजार ०३३ फुट जमीन २०१८ मध्ये भद्रावती नगर पालिकेने ६६ हजार रुपये प्रतिमहिना भाडेतत्त्वावर घेतली होती. प्रारंभी काही महिने भाडे दिल्यानंतर पालिकेने पुढील भाडे थकवले. थकीत भाडे जवळपास ६६ लाख रुपयांवर पोहोचले. या रकमेची गुंडावार यांनी नगर पालिका कार्यालयाकडे अनेकदा मागणी केली. त्यासाठी पुरेशी संधीही दिली. मात्र नगर पालिकेतर्फे थकीत रक्कम देण्यात न आल्याने गुंडावार यांनी याविरोधात वरोरा दिवानी न्यायालयात खटला दाखल केला. या खटल्याचा निकाल न्यायालयाने गुंडावार यांच्या बाजुने देत रक्कम वसुलीसाठी जप्तीचे अधिकार गुंडावर यांना दिले.
न्यायालयाच्या आदेशानुसार गुंडावार यांनी आज, सोमवारी (दि.३०) नगर परिषद कार्यालयात जाऊन जप्तीची कारवाई केली. या जप्ती अंतर्गत कार्यालयातील मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची, वाहन, सोफा, इतर खुर्च्या, यांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे भद्रावती नगरपालिकेची लक्तरे वेशीला टांगली गेली.
नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे काय?
नगरपालिकेजवळ भाड्याची रक्कम चुकती करण्यास पुरेसा पैसा नाही. ही रक्कम पाच टप्प्यांमध्ये देण्याचा प्रस्ताव गुंडावार यांना देण्यात आला. मात्र त्यांनी तो मान्य न करता जप्तीची कारवाई केली, असे भद्रावती नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी सांगितले.
…तर आणखी साहित्य जप्त करणार
जप्त करण्यात आलेल्या साहित्यांचा लिलाव करून भाड्याची रक्कम वसूल करण्यात येईल. वसुली पूर्ण न झाल्यास आणखी साहित्य जप्त करण्यात येईल, असे भूखंड मालक संजय गुंडावार यांनी स्पष्ट केले.