अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात घेणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाला हरताळ फासण्यात आली आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये सामूहिक कॉपीचे सर्रास गैरप्रकार घडत आहेत. या प्रकरणांमध्ये शिक्षण विभागाने देखील कठोर भूमिका घेतली. सामूहिक कॉपी प्रकरणात थेट केंद्र प्रमुख व पर्यवेक्षकांवर आरोप ठेऊन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली.
राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. प्रशासनाकडून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. मात्र, त्याचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. अनेक ठिकाणी सर्रासपणे कॉपी होत आहे. काही ठिकाणी तर सामूहिक कॉपी देखील झाली. वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील शेंदुरजना आढो, रुई गोस्ता आणि किन्ही राजा येथील परीक्षा केंद्रांवर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने छापा टाकून बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या २० विद्यार्थ्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणात तीन केंद्र प्रमुखांसह इतर पर्यवेक्षक शिक्षकांवर आसेगाव आणि जऊळका पोलीस ठाण्यामध्ये गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेंदुरजना आढो येथील आप्पास्वामी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेमध्ये दोन विद्यार्थी कॉपी करताना पकडल्या गेले. तसेच रुई गोस्ता येथील वाघामाय देवी आदिवासी आश्रम शाळेच्या परीक्षा केंद्रावर एकूण १७ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली.
या प्रकरणी मानोरा पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी अनिल पवार यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून केंद्र प्रमुख व ६ पर्यवेक्षक शिक्षकांवर आसेगांव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. किन्ही राजा येथील वसंतराव नाईक महाविद्यालय परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाच्या परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडल्याने मालेगावचे गट शिक्षणाधिकारी गजानन परांडे यांनी जऊळका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्या तक्रारीवरून केंद्र प्रमुख आणि इतर दोन पर्यवेक्षकांविरोधात जऊळका पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. वाशीम जिल्ह्यातील सामूहिक कॉपी प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आले आहे.
कॉपीमुक्त नव्हे तर कॉपीयुक्त परीक्षा
वाशीम जिल्ह्यातील केंद्र क्रमांक ०९०६ श्री मैनागीरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, टो-जुमडाफाटा येथे इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर सामूहिक कॉपी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
