अकोला : वाशीम जिल्ह्यातील शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज संस्थानविरोधात जिल्हा न्यायालयातील नुकसान भरपाई प्रकरणातील वादावर तब्बल ६४ वर्षांनी ऐतिहासिक तडजोड करण्यात आली आहे. गेल्या सहा दशकाहून अधिका काळापासून हा खटला न्यायालयात सुरू होता. अखेर संवादातून नुकसान भरपाईचा वाद मिटवण्यात यश आले आहे. या प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे.
न्यायालय म्हटले की ‘तारीख पे तारीख’ला हजेरी लावत अनेक वर्ष निघून जातात. त्यामुळे आपसी समन्वयातून वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. वाशीम जिल्ह्यात याच प्रयत्नातून ६४ वर्ष वादावर पडदा पडला आहे. वाशीम जिल्हा न्यायालयामध्ये सुमारे ६४ वर्षांपासून प्रलंबित असलेला दिवाणी वाद आपसी सहमतीने निकाली काढण्यात आला. सन १९६१ पासून प्रलंबित असलेला दिवाणी दावा क्रमांक ३/१९६१ (नवीन क्रमांक दि.अ.क. ५०/२०१२) अनिल विरेंद्र श्रावणे व इतर विरुद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज संस्थान, शिरपूर हा नुकसानभरपाई संबंधीचा वाद होता. या प्रकरणी जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांच्या न्यायालयात प्रलंबित होते.
‘साधता संवाद, मिटतो वाद’ या उक्तीने प्रेरणा घेऊन दोन्ही पक्षकारांनी तडजोडीतून वाद मिटवण्याचा मार्ग स्वीकारला. अपिलाची सुनावणी चालू असताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी दोन्ही पक्षांना संवादाद्वारे तोडगा काढण्यास प्रवृत्त केले. या प्रकरणात अपिलार्थी तर्फे ॲड. एस. जी. बाकलीवाल व ॲड. अनुप एस. बाकलीवाल तसेच उत्तरवादी तर्फे ॲड. राम जोशी व ॲड. आशिष गोलेच्छा यांनी पक्षकारांशी चर्चा करून एकमत घडवून आणण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सुमारे ६४ वर्षे न्यायालयात लांबलेला वाद आपसी समन्वयातून निकाली निघाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुवमण्यम यांनी दोन्ही पक्षकारांचे कौतुक केले.
‘न्याय व्यवस्थेतील सकारात्मक बदलाचे प्रतीक’
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम म्हणाले, “न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे संवाद व समन्वयाद्वारे मोठ्या प्रमाणात निकाली काढता येतात. लोक न्यायालयामध्ये अधिकाधिक प्रकरणे याच माध्यमातून सोडवतात.” दीर्घकालीन वैमनस्याला पूर्णविराम देत दोन्ही पक्षांनी परस्पर सहकार्याचे आदर्श उदाहरण ठेवले. न्याय व्यवस्थेतील सकारात्मक बदलाचे हे प्रतीक ठरत आहे.
