बुलढाणा : वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी आणलेले तब्बल ५ लाख रुपये बुलढाणा शहरातून चोरणाऱ्या आंतरराज्यीय ‘बॅगलिफ्टर’ला जेरबंद करण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. शाखेच्या पथकाने कर्नाटकातील शिवमोगा येथून चोरट्यास अटक करून आरोपीकडून संपूर्ण ५ लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. यामुळे त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील संततधार अश्रू पुसण्याची कामगिरी पोलिसांनी केली आहे.

या गंभीर व तितक्याच नाट्यमय घटनाक्रमाची पार्श्वभूमी देखील रंजक आहे. नितीन जिजेबा प-हाड (राहणार रिसोड, जिल्हा वाशिम) यांची मुलगी श्रुती हिचा बुलढाणा येथील राजश्री शाहू महाविद्यालयात बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाला होता. आता मुलगी डॉक्टर होणार म्हणून या शेतकऱ्याला आनंद अनावर झाला. त्याची फी भरण्यासाठी त्यांनी मेहकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधून ५ लाख रुपये काढले.मागील १६ सप्टेंबर २०२५ रोजी ते बुलढाणा आले. पाच लाखांची रक्कम कारमध्ये ठेवून ते कॉलेजमध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी कारचा काच फोडून रोख रक्कम लंपास केली. याबाबत बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. फिर्यादी शेतकरी असल्याने ही रक्कम त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून घटनेमुळे त्यांना मानसिक व आर्थिक धक्का बसला होता.

असा लागला तपास

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. ‘सीसीटीव्ही फुटेज’ च्या आधारे तपास करताना आरोपी हा सराईत आंतरराज्यीय ‘बॅगलिफ्टर’ असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर मुख्य आरोपी सुनिल उर्फ बाळू रामु बोवी (वय ३२, राहणार भद्रावती, जिल्हा शिवमोगा, कर्नाटक) याला पेस कॉलेज परिसरातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली.
चौकशीत त्याने हा गुन्हा भाऊ विष्णु रामु बोवी याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेले संपूर्ण ५ लाख रुपये हस्तगत करण्यात आले .आरोपी हा सराईत गुन्हेगार असून विविध राज्यांमध्ये त्याच्यावर बॅगलिफ्टिंगचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील कारवाईसाठी आरोपीला बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. यात पोलीस उप निरीक्षक अविनाश जायभाये,पोलीस हवालदार दिपक लेकुरवाळे, चाँद शेख, गणेश पाटील, जमादार गजानन गोरले, तांत्रिक विश्लेषण कक्षाचे हवालदार राजु आडवे, पवन मखमले, ऋषी खंडेराव यांचा समावेश होता .