अकोला : सिंचन प्रकल्पात शेत रस्ता गेला. शेजारील शेतकऱ्याने देखील रस्ता अडवल्याने मोठी अडचण झाली. आपले शेत गाठावे कसे या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली. या शेतकऱ्याने चक्क ५० हजारांची होडी विकत घेतली. या होडीच्या माध्यमातून धरणाच्या पाण्यातून शेतात येण्या-जाण्यासाठी शेतकऱ्याने नवा मार्ग निवडला. प्रशासन व शेजारील शेतकऱ्याने साथ न दिल्याने शेतकऱ्याने हा निर्णय घेतला. वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या या भूमिकेची चांगलीच चर्चा होत आहे.

नेमका प्रकार काय घडला?

वाशीम जिल्ह्यातील मौजा गावाजवळील सावरगाव जिरे शेत शिवारात सिंचन तलाव प्रकल्प दशकभरापूर्वी तयार केला आहे. या प्रकल्पामध्ये असंख्य शेतकऱ्यांची शेत जमीन गेली. प्रकल्पासाठी शेत रस्त्याचे सुद्धा भूसंपादन करण्यात आले. यामध्ये सुभाष सरनाईक यांचे शेत धरण काठावर असल्याने शेजारच्या शेतातून येणे-जाणे करीत शेती करावी लागत होती. मात्र, शेतातून जाण्यासाठी आता शेजारील शेतकऱ्याने मज्जाव केला.

रस्ताच नसल्याने शेत गाठावे कसे?

शेती गाठण्यासाठी रस्ताच नसल्याने जावे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. शेती नेमकी कशी करावी? या विचारात शेतकरी अडकला. शेती पडीक राहण्याचा धोका निर्माण झाला. वादामुळे शेजारील शेतकरी देखील ऐकण्याचा मनस्थितीत नसल्याने शेतकऱ्यापुढे मोठी समस्या उभी झाली.

शेतकऱ्याने विकत घेतली होडी

शेतात जाण्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकरी सुभाष सरनाईक यांनी ५० हजार रुपये खर्चून होडी ( नाव) खरेदी केली. त्या होडीतून प्रवास करून ते आता शेती गाठतात. मात्र, या होडीतून शेतकऱ्यांचा प्रवास अत्यंत धोकादायक ठरत आहे. जीव धोक्यात घालून किती दिवस शेती गाठायची? शेतीच्या इतर कामांचे काय? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यासमोर ठाकले आहेत. शेतीसाठी रस्ता निर्माण करण्याचा प्रशासन आणि सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

प्रकल्पांसाठी भूसंपादन, शेतकऱ्यांची मात्र गैरसाय

विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जाते. शेतकऱ्यांना त्याचा चांगला मोबदला देखील मिळतो. मात्र, त्यानंतर उर्वरित शेतीमध्ये शेतकऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. याचे उत्तम उदाहरण वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्याचे आहे. प्रकल्पात शेतकऱ्याची शेती गेली आणि येण्या-जाण्यासाठीचा रस्ताही गेला. मोठी अडचण निर्माण झाल्यावर शेतकऱ्याला होडी विकत घेऊन त्यातून प्रवास करावा लागत आहे. या प्रकरणातून शेतकऱ्यांचे विदारक चित्र स्पष्ट होते.