अकोला : धार्मिक, सांस्कृतिक, पवित्र व एकत्मतेचा प्रतीक असलेल्या गणेशोत्सव सणाला गालबोट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न वाशीम शहरात झाला. शहरातील काळे फैल परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात गणेशमूर्तीच्या पायथ्याशी पॉर्न वेबसाईटची लिंक असलेला क्यूआर कोड चिकटवण्याचा संतापजनक प्रकार तीन माथेफिरू तरुणांनी केला. या प्रकरणात तपासाची सूत्रे वेगाने फिरवत पोलिसांनी त्या तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना २१ सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली.
नेमकं घडलं काय?
वाशीम शहरातील जय भवानी गणेश मंडळाच्या मूर्तीजवळ १७ सप्टेंबर रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास अश्लील व्हिडिओ प्रसारित करणारा क्यूआर कोड लावण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी राम अर्जुन काळबांडे (रा. काळे फैल, वाशीम) यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २९९, ३५६ (२) बी सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ आणि ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चार पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सूक्ष्म पाहणी केली. संशयितांची ओळख पटवली.
आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये तन्मय शंकर मुठाळ (वय १९ वर्ष, रा. चिवरा, (मालेगाव, ह.मु.माधव नगर, वाशीम), युगंधर मोहन अफुने (वय १८ वर्ष, रा. अंबिका नगर, लाखाळा, जि. वाशीम) आणि सुमित कैलास भोने (वय १८ वर्ष, रा. सावरगाव जिरे, जि. वाशीम) यांचा समावेश आहे. आरोपींची सखोल विचारपूस केली. त्यांनी कृत्य केल्याची कबुली दिली. आरोपींना वाशीम जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपींची सखोल चौकशी होणार
या आरोपींनी अशा प्रकारचे क्यूआर कोड इतर कुठे चिकटवले आहेत का? तसेच याव्यतिरिक्त त्यांनी इतर काही सायबर गुन्हे केले आहेत का? या दृष्टीने पोलीस सखोल चौकशी करणार आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे व वाशीम शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली.
