अकोला : अवैध सावकारीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अवैध सावकारी व्यवहारासंदर्भात प्राप्त तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील कलम १६ अंतर्गत आज वाशीम येथे दोन ठिकाणी झडतीची कारवाई केली. या कारवाईत १३ लाख ३०० रुपये रोख रक्कम आणि ८८ किलो चांदीचे मोठे घबाड पथकाच्या हाती लागले. कथित अवैध सावकारी व्यवहाराच्या पुढील चौकशीसाठी विविध महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली.

चौकशीसाठी कागदपत्रे ताब्यात

अवैध सावकारीतून अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. विशेषतः शेतकरी कर्जबाजारी होऊन अवैध सावकारीचे बळी ठरतात. दरम्यान, सहकार विभागाकडे एका व्यक्तीने अवैध सावकारी व्यवहारासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने सहकार विभाग आणि पोलीस विभागाच्या दोन पथकांनी दोन व्यावसायिकांच्या ठिकाणी झडती घेतली. या कारवाईदरम्यान स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, खरेदीखते, करारनामे, कोरे व निनावी धनादेश, कोरे बाँड तसेच सावकारी व्यवहारासंदर्भातील रजिस्टर आदी कागदपत्रे पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत.

सावकारी कायद्यानुसार चौकशी

सहकार विभागाने केलेल्या कारवाईत १३ लाख ३०० रुपये रोख रक्कम आणि ८८ किलो चांदी आढळून आली. या प्रकरणात सावकारी कायद्यानुसार पुढील चौकशी सुरू आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे आणि विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था माणिक लटपटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहायक निबंधक ईश्वर काबरा आणि पी.टी. सरकटे यांनी पथकप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. कारवाईसाठी जी.एन. कुकडे, ए.बी. सावंत, एस.पी. सांगळे, रुबीया शेख, व्ही.आर. ढोबळे, भारती इगळे, परेश राऊत आणि राजकुमार भगत यांनी सहायक म्हणून काम पाहिले. रवि आकुलवार आणि मारोती भेंडेकर यांनी आवश्यक नियोजन व व्यवस्था केली.

गोपनीय तक्रारीसाठी नागरिकांनी पुढे यावे

अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी अशा व्यवहारांची माहिती सहकार विभागाकडे द्यावी. जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रार करता येणार असून तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, अशी माहिती एम.एस. लटपटे यांनी दिली.