अकोला : कुटुंबीयांचा आंतरजातीय विवाहाला प्रखर विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने टोकाचे पाऊल उचलले. तलावात उडी घेऊन प्रेमीयुगुलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी परिसरात उघडकीस आली आहे. दोन्ही कुटुंबाकडून तरुण-तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार मालेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान, तलावात दोघांचेही मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. प्रेमाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोकसावंगी परिसरातील महादेव गजानन निंबाळकर (वय २४) आणि निकिता संतोष कांबळे (वय २१) हे दोघे १४ ऑगस्टपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी मालेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुण व तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलीस व कुटुंबीयांकडून शोध सुरू होता. दरम्यान, तलाव परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या नागरिकांना दोघांचे मृतदेह आढळून आले. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तलावातून दोघांचेही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. मालेगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
विवाह करून संसार थाटण्याचे होते स्वप्न, पण
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दोघांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांना विवाह करून संसार थाटायचा होता. मात्र, दोघे वेगवेगळ्या जातीतील असल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. तरीही दोघांनी हिम्मत सोडली नव्हती. त्यांनी कुटुंबीयांची समजूत काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. कुटुंबीयांकडून विवाहाला परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे दोघेही हतबल झाले. अखेर दोघांनी टोकाचा निर्णय उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मानसिकतेत बदल नाहीच
आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जातीभेद कमी करून सामाजिक समता आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांकडून अशा विवाहांना कायदेशीर मान्यता आणि आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. मात्र, त्यानंतरही समाजातील मानसिकतेत बदल न झाल्याने पदोपदी आंतरजातीय विवाहांना विरोध होत असल्याचे समाेर येत आहे. वाशीम जिल्ह्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेवरून हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. हे प्रकार टाळण्यासाठी समुपदेशन करण्याची गरज आहे.
