अकोला : वाशिम नगर पालिका निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराविरोधात दाखल याचिका फेटाळली आहे. या निर्णयामुळे वाशिम मध्ये भाजपला मोठा दिलासा मिळाला. भाजपचे वाशीम नगर पालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे यांच्याविरुद्ध त्यांचा मुलगा शासकीय कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेत त्यांची उमेदवारी रद्द करण्यासंदर्भात विरोधी पक्षाच्यावतीने प्रवीण वसंत मापारी यांनी वाशीम येथील जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते.

त्यावर निर्णय देतांना विद्यमान न्यायालयाने अपील फेटाळून लावत भाजपा उमेदवार अनिल केंदळे यांना दिलासा दिला. या प्रकरणाची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्या न्यायालयात झाली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी केली. न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. भाजपचे उमेदवार अनिल केंदळे हे निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणे पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे.

वाशिम नगर पालिका निवडणुकीची प्रचार मोहीम रंगात आली आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असतांनाच वाशिममध्ये कंत्राटदाराच्या मुद्द्यावरून न्यायालयात धाव घेण्यात आली. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच भाजप उमेदवार अनिल केंदळे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्याची मागणी न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. निर्णायक क्षणी न्यायालयाचा हा निकाल भाजप पक्षाच्या बाजूने आला. भाजप उमेदवार अनिल केंदळे यांच्यावतीने ॲड. सुधीर मोरे यांनी बाजू मांडली. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार रेखा सुरेश मापारी यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक असल्याचे बोलल्या जात आहे.

बहुरंगी लढतीचे संकेत

वाशिम जिल्ह्यातील वाशीम, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर नगर पालिका आणि मालेगाव नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. चार नगर पालिका व एका नगर पंचायतीमध्ये एकूण ६९ प्रभागातील १३८ सदस्य व पाच नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये वाशीम १६, कारंजा १५, मालेगाव १७, रिसोड ११ व मंगरुळपीरमधील १० प्रभागांचा समावेश आहे. वाशीम जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत रिसोडचा अपवाद वगळता इतर ठिकाणी महायुती झाली नाही. युतीतील घटक पक्ष स्वबळावर रिंगणात आहेत. दुसरीकडे सर्वच ठिकाणी मविआ झाली. या अगोदर मंगरुळपीर व कारंजा या नगर पालिकांवर वंचित आघाडीचे नगराध्यक्ष होते. वंचित देखील रिंगणात आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्यात पाचही ठिकाणी बहुरंगी लढत होणार असल्याचे संकेत आहेत. चुरशीचे सामना होणार आहेत.