अकोला : वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. चारित्र्याच्या संशयातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. सकाळी मुलगी आईच्या खोलीत गेल्यानंतर हा रक्तरंजित थरार उघड झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दिनेश जोंधळे (वय ४५) असे आरोपी पतीचे नाव असून, शारदा जोंधळे (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण वाशीम जिल्हा हादरला आहे.

व्यसनाधीन पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय

मिळालेल्या माहितीनुसार, पती हा व्यसनाधीन असून, पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री पती-पत्नी नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी खोलीत गेले होते. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. दरम्यान, पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने जबर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला होता. या दोघांनाही तीन अपत्य असून दोन मुली विवाहित आहेत, तर मुलगा १५ वर्षांचा असून तो शिक्षण घेतो. दिनेशचे वृद्ध आई वडील हे समोरच एका छोट्या घरात स्वतंत्र राहतात. घटनेच्या रात्री या दाम्पत्याचा एक मुलगा आणि मुलगी तिथे झोपण्यासाठी गेले होते.

थारोळ्यात पडलेला आईचा मृतदेह पाहताच मुलीचा आक्रोश

रविवारी सकाळी मुलगी आईच्या खोलीत गेली असता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आईचा मृतदेह पाहून तीने एकच आक्रोश केला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जऊळका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीचा शोध घेऊन त्याला मालेगाव शहरातून ताब्यात घेत अटक केली. त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौटुंबिक हिंसाचार चिंताजनक

पत्नीच्या हत्या प्रकरणाचा पुढील तपास जऊळका पोलीस करीत आहेत. चारित्र्याच्या संशयातून एका विवाहित महिलेची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शोककळा पसरली आहे. कौटुंबिक वादाचे रूपांतर अशा टोकाच्या हिंसाचारात झाल्याने या प्रकारच्या घटना चिंताजनक ठरत आहेत.