अकोला : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात वाकळवाडी गावातून समोर आला आहे. प्रियकराच्या सहकार्याने पत्नीने पतीला दारू पाजली आणि दोरीने गळा आवळून निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून आरोपींविषयी तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

घटना कशी घडली?

मृतक सुरेश राजाराम झळके (वय ३०, रा. अमानी, ता. मालेगाव) हा तरुण गेल्या चार-पाच दिवसांपासून वाकळवाडी येथील आपल्या सासुरवाडीला गेला होता. ३० जुलै रोजी वाकळवाडी शिवारातील सुनील चोंडकर यांच्या शेतात सुरेश झळके यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठवून पंचनामा करण्यात आला. तपासाची सूत्रे वेगाने फिरवली.

हत्येचा पत्नीवर संशय; कसून चौकशी

सुरेश झळके यांचा मृत्यू संशयास्पद असल्याने मालेगाव पोलिसांनी त्यांची पत्नी आशा सुरेश झळके आणि तिचा प्रियकर महादेव बजरंग अंभोरे (वय २५, रा. पूर, ता. मंगरुळपीर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पती सुरेश आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या सोबत मिळून पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला होता. त्यातून दोघांनी हत्या केली.

आत्महत्येचा बनाव, पण…

३० जुलै रोजी संशयित आरोपींनी मृतकाला खूप दारू पाजली. तो नशेत असहाय्य झाला. त्यानंतर दोघांनी मिळून दोरीने गळा घट्ट आवळत फाशी दिली. पत्नी व तिच्या प्रियकराने अतिशय निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर हा प्रकार आत्महत्या किंवा अपघात वाटेल, असा बनाव रचून मृतदेह शेतात टाकून दिला. पोलीस तपासात मात्र दोघेही अडकले. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपासामध्ये पत्नीने आपल्या प्रियकराला सोबत घेऊन हत्या केल्याचे उघडकीस झाले. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत. अनैतिक संबंधासाठी पतीचा बळी घेण्याच्या भयावह आणि संवेदनाहीन घटनेवर तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.