अकोला : गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये क्रमांक लावण्यावरून वाद झाला. या वादात माजी पंचायत समिती उपसभापती भोवळ येऊन पडले आणि त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे घडली. शिवाजी जनार्दन बकाल (वय ५५, रा. तिवळी, माजी उपसभापती, पंचायत समिती मालेगाव) असे मृतकाचेचे नाव आहे. या घटनेनंतर शिरपूर आणि पोलीस ठाण्याच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेने खळबळ उडाली. या प्रकरणी गणेश मंडळाच्या १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नेमकं घडलं काय?
वाशीम जिल्ह्याच्या तिवळी गावात २६ सप्टेंबरला रात्री विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत क्रमांक लावण्यावरून दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यावसान वादात झाले. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. या घटनेदरम्यान शिवाजी बकाल हे भोवळ येऊन खाली कोसळले. त्यांची प्रकृती खालावली. तत्काळ त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
कार्यकर्ते, नातेवाईक संतप्त; पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
या घटनेमुळे संतप्त झालेले नातेवाईक, मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिरपूर पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी नागरिकांनी बसस्थानक ते वाघी रोड दरम्यान पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत केली.
मृतदेत पोलीस ठाण्याच्या परिसरात
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी व नातेवाईकांनी मृतदेह शिरपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात आणला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत वापरलेली तीन बँड वाहने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केली. या प्रकरणी शिरपूर जैन पोलिसांनी गणेश मंडळाच्या १५ ते २० कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
‘इन कॅमेरा’ उत्तरीय तपासणी
गणेश मंडळातील वादानंतर झालेल्या मृत्यू प्रकरणात ‘इन कॅमेरा’ उत्तरीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिरवणुकीतील वादानंतर धक्काबुक्कीतील सहभाग आणि शिवाजी बकाल यांच्या मृत्युचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. शिरपूर पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
