अकोला : वाशीम जिल्ह्यात आणखी दोन तरुण नदीपात्रात बुडाले आहेत. मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे अडाण नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती वाशीमचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी दिली. वाशीम जिल्ह्यात गत २४ तासांत वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा नदीपात्रात अंत झाला. यामध्ये तीन जण पोहण्यासाठी गेले असतांना बुडाले, तर एका विद्यार्थ्याने धरणात झोकून देत आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाचवण्यासाठी गेला अन् दोघेही बुडाले

मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील श्री गोमुखेश्वर संस्थानसमोरील अडाण नदीत पोहण्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. दर्शन सुनील वावगे (वय २३, रा. भातकुली, जि. अमरावती) व शुभम अमोल धोंडे अंदाजे (वय १८, रा. इंझोरी) अशी मृत तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन नदीपात्रात पोहण्यासाठी उतरला. यावेळी तो नदीत बुडत होता. हे पाहून त्याला वाचवण्यासाठी शुभमने पाण्यात उडी मारली. मात्र, दुर्दैवाने पाण्याच्या खोल भागात गेल्याने दोघेही बुडाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन शोध मोहीम राबवली. घटनेची माहिती महसूल व पोलीस प्रशासनाला देण्यात आली.

तणावातून विद्यार्थ्याने जीवन संपवले

डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने वडिलांसमोरच धरणात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी घडली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा देखील पाय मोडला आहे. कारंजा ते मानोरा मार्गावरील अडाण धरणाच्या पुलावरून जात असतांना विद्यार्थ्याने अचानक उडी मारली. कारंजा तालुक्यातील कुपटी येथील २२ वर्षीय संचित सुभाष मुंदे असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोहतांना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला

आणखी एका घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी १८ वर्षीय अंश विजय जयस्वाल हा आपल्या चार मित्रांसह मानोरा तालुक्यातील फुलउंबरी येथील धरणात शनिवारी पोहण्यासाठी गेला होता. यामुळे तो पाण्यात बुडाला. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. २४ तासांत चार जण बुडाल्याने वाशीम जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.