अकोला : महिलेच्या हत्या प्रकरणामुळे वाशीम शहर हादरले आहे. वाशीम शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील विश्राम कक्षाजवळ अज्ञात महिलेची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली. अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकरणी वाशीम शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली.

वाशीम शहरातील रेल्वेस्थानकाजवळ एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने घटनास्थळावर धाव घेतली. पाहणी करताना विश्राम कक्षासमोरील संरक्षण भिंतीजवळ अंदाजे ४५  वर्षे वयाच्या महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. महिलेच्या शरीरावर गंभीर जखमा असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी वाशीम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे पुढील तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह अन्य पुरावे गोळा केले जात आहेत. या घटनेमुळे वाशीम शहर चांगलेच हादरले आहे. 

पुरावे नष्ट करण्यासाठी हत्या?

आरोपीने महिलेवर अत्याचार करून पुरावा मिळू नये, यासाठी ही हत्या केल्याची चर्चा आहे. दरम्यान, वाशीम शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि रेल्वे पोलीस घटनेचा तपास करीत असून मृत महिलेच्या हातावर छाया मोहन असे नाव आहे. ही मृत महिला बाहेर जिल्ह्याची असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सखोल तपास सुरू

महिलेचा मृतदेह रेल्वेस्थानक परिसरात असल्याच्या माहितीवरून पथकाने घटनास्थळ गाठले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्युचे नेमके कारण व अत्याचार झाला की नाही? हे स्पष्ट होईल, असे वाशीम शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

राज्यात मुली, तरुणी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोज कुठेना कुठे अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. या प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जनमानसात संतापाची भावना असून अशा प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.