अकोला : अनियंत्रित भरधाव खासगी बसने रस्त्याच्या कडेवरील तीन ते चार टीन-पत्र्याच्या दुकानांना चिरडल्याची भीषण दुर्घटना वाशीम शहराजवळ आज, २६ जूनला पहाटे घडली. या थरारक अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. या अपघातामध्ये चार ते पाच जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे चांगलीच खळबळ उडाली.
नेमकी घटना काय?
नागपूरवरून परभणीच्या दिशेने जाणाऱ्या खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. वाशीम शहरालगतच्या पुसद महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरधाव धावणारी ही खासगी बस थेट दुभाजकांवर आदळली. वेगामुळे दुभाजक तोडून रस्त्याकडेला असलेल्या तीन ते चार दुकानांवर गेली. या भरधाव खासगी बसने समोरील टीन पत्र्याची दुकाने संपूर्णत: उद्ध्वस्त केले. प्रचंड आवाजामुळे गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना मोठा धक्का बसला. एकच गोंधळ उडाला. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. या घटनेने प्रवाशांमध्ये प्रचंड भीती पसरली.
बसचा चालक, प्रवासी जखमी
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदत कार्य सुरू करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या भीषण अपघातात बसचा चालक, प्रवासी असे चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने इतर प्रवासी सुरक्षित असून त्यांना दुसऱ्या वाहनाने पुढे रवाना केले.
मोठा अनर्थ टळला
भरधाव खासगी बसने दुकानांना चिरडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. हा अपघात पहाटेच्या वेळी घडला. त्यावेळी ही दुकाने बंद होती. पहाटेच्या सुमारास घटनास्थळावर कोणीही उपस्थित नव्हते. परिणामी, या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली. जर हा अपघात दिवसा किंवा वर्दळीच्या वेळी झाला असता, तर मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
धोकादायक वाहतूक
महामार्गांवर रात्रीच्या सुमारास खासगी बसमधून प्रवाशांची अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जाते. चालकांकडून भरधाव वेगाने खासगी बस चालवल्या जातात. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन अपघातांच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. यावर परिवहन विभागाकडून नियमित तपासणी होऊन नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. मात्र, परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. त्यामुळे सातत्याने अपघात घडून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
