अकोला : थारच्या थराराने वाशीम शहर चांगलेच हादरले आहे. भरधाव थार मोटार अनियंत्रित होऊन पाच ते सात वाहनांना चिरडल्याची धक्कादायक घटना वाशीम शहरात घडली. या भीषण अपघातात तीन ते चार जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.
सुसाट ‘थार’ जीपने घातला धुमाकूळ
वाशीम शहरातील बालाजी मंदिर परिसरात दुपारी एका सुसाट ‘थार’ जीपने धुमाकूळ घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने या वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या पाच ते सात वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बालाजी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावरून एक थार गाडी अत्यंत वेगाने जात होती. अचानक चालकाचा ताबा सुटल्याने या गाडीने समोर येणाऱ्या आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना एकापाठोपाठ एक धडक दिली. धडक इतकी भीषण होती की काही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
जखमींना रुग्णालयात हलवले
थार जीपच्या अपघातात जखमी झालेल्या तीन ते चार जणांना स्थानिक नागरिकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. भरधाव वेगामुळेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून चौकशी सुरू आहे.
सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर
वाशीम शहरात थार जीप अनियंत्रित होऊन भीषण अपघात घडला. पाच ते सात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. सर्वसामान्य नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न मात्र चव्हाट्यावर आला आहे. दिवसाढवळ्या भरधाव मोटारीचा थरार दिसून आला. निष्काळजीपणे वाहन चालवल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला. ही अत्यंत गंभीर घटना असून या प्रकारच्या बेजबाबदार कृत्यावर त्वरित आळा बसविण्याची गरज आहे. वाशीम शहरांमध्ये यापूर्वी देखील असे धक्कादायक प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या थरारक अपघातामुळे वाशीम शहरात मोठी खळबळ उडाली होती.
