अकोला : कौटुंबिक वादातून पत्नीने रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी घेतली. पत्नीला वाचवण्यासाठी पतीने देखील विहिरीत उडी मारली. दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना वाशीम जिल्ह्याच्या मंगरूळपीर तालुक्यातील सवासनी गावाच्या शेतशिवरात २५ नोव्हेंबरला रात्री घडली.
अमोल किसन जगताप (वय ४० वर्ष), सीमा अमोल जगताप (वय ३५ वर्ष) असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे. आई व वडिलांच्या मृत्युमुळे मुलगा-मुलगी पोरके झाले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सवासनी येथील रहिवासी अमोल जगताप ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, तर पत्नी शेतमजुरी करीत होती. त्यांच्याकडे शेती नव्हती. कौटुंबिक कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले. या वादातून पत्नीने टोकाचा निर्णय घेऊन शेतशिवारातील विहिरीत उडी मारली. पत्नीला वाचवण्यासाठी पतीने देखील उडी घेतली. दरम्यान, घरी पती-पत्नी आढळून न आल्याने शोधाशोध सुरू झाली. रात्री ११ वाजताच्या सुमारास गावानजीक शेतातील विहिरी जवळ चप्पल पडलेली दिसून आली. मंगरूळपीर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनद्वारे संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या पथकाला पाचारण केले. दोघांपैकी एकाने आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी घेतली आणि दुसऱ्याने वाचवण्यासाठी उडी मारल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, आज सकाळी ६ वाजता अतुल उमाळे, गोपाल गीरे, अजय डाके, शुभम भोपळे, अपुर्व चेके, राहुल निंबाळकर, प्रदिप आडे यांनी शोध व साहित्यासह तत्काळ शोध मोहीम सुरू केली. अगोदर पत्नीचा व त्यानंतर पतीचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला, अशी माहिती दीपक सदाफळे यांनी दिली.
घटनेमुळे प्रचंड खळबळ
कौटुंबिक वादातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीचाही मृत्यू झाला. विहिरीत बुडून दाम्पत्याचा करुण अंत झाल्याने गावासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांचा मुलगा १५ वर्षांचा असून मुलगी १२ वर्षांची आहे. आई वडील एकाच वेळी जग सोडून गेल्याने भाऊ बहीण आता पोरके झाले आहेत. घटनास्थळावर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार सुधाकर अनासने, ठाणेदार किशोर शेळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत आदी उपस्थित होते.
