अकोला : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने वडिलांसमोरच धरणात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना वाशीम जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी घडली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा देखील पाय मोडला आहे.
वाशीम जिल्ह्यातच दुसऱ्या एका घटनेत धरणात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
तणावातून विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय?
कारंजा ते मानोरा मार्गावरील अडाण धरणाच्या पुलावरून जात असतांना विद्यार्थ्याने अचानक उडी मारली. कारंजा तालुक्यातील कुपटी येथील रहिवासी २२ वर्षीय संचित सुभाष मुंदे हा अत्यंत हुशार आणि होतकरू तरुण होता. वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या तो तयारीत होता. आपल्या वडिलांसोबत पुलावरून जात असतांना काही समजण्याच्या आतच संचितने अचानक धरणाच्या पात्रात उडी घेतली. डोळ्यांदेखत मुलाने धरणात उडी मारल्याचे पाहून वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली.
मुलाला वाचवण्यासाठी ते धरणाच्या पात्राकडे धावले. उतारावर त्यांचा पाय मुरगळला. त्यामध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. डोळ्यांसमोर आपला तरुण मुलगा पाण्यात दिसेनासा होताना पाहून त्या हताश पित्याने टाहो फोडला. या घटनेची माहिती कारंजा तहसीलदार रवी महाले तसेच मानोरा तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनद्वारे संचालित संतगाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. आपल्या सहकाऱ्यासह त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन २० ते २५ फूट खोल पाण्यात शोध मोहीम राबवली. मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला.
धरणात पोहणे जीवावर बेतले
दुसऱ्या घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी १८ वर्षीय अंश विजय जयस्वाल हा आपल्या चार मित्रांसह मानोरा तालुक्यातील फुलउंबरी येथील धरणात पोहण्यासाठी गेला होता. खोल पाणी आणि तळाशी असलेल्या गाळाचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच मानोराचे तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी तातडीने संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला मदतीसाठी पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पथकाने मृतदेह शोधून बाहेर काढला. या दोन्ही घटनांमध्ये परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
