अकोला : नराधम शिक्षकाचे १४ चिमुकल्या मुलींसोबत दुष्कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार वाशीम जिल्ह्याच्या काटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला. ५६ वर्षीय नराधम शिक्षक तिसरी आणि चौथीतील निष्पाप चिमुकल्या मुलींसोबत अश्लील चाळे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन वाशीम ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी रात्री उशीरा गुन्हे दाखल करून नराधम शिक्षक दिलीप बोरकर (वय ५६) याला अटक केली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
चिमुकल्या विद्यार्थिनींना दाखवायचा अश्लील चित्रफित
पहिली ते चौथीपर्यंतची काटा येथे जिल्हा परिषद शाळा आहे. शाळेत दोन शिक्षक आणि दोन शिक्षिका कार्यरत आहेत. यातील आरोपी शिक्षकाने गत सात ते आठ महिन्यांपासून तिसरी आणि चौथीतील निष्पाप चिमुकल्या विद्यार्थिनींना मांडीवर बसवून मोबाइलवर अश्लील चित्रफित दाखवत होता. मुलींच्या शरीराला अयोग्य स्पर्श करून अत्याचार करायचा. कोणालाही सांगितल्यास शाळेत येऊ देणार नाही, अशी धमकीही तो विद्यार्थिनींना देत होता.
शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला धक्कादायक प्रकार
दरम्यान, शाळेतील एका शिक्षिकेकडे जाऊन मुली रडू लागल्या. त्यांनी घाबरलेल्या मुलींना विश्वासात घेऊन विचारपूस केली. मुलींनी त्यांच्यासोबत नराधम शिक्षकाकडून घडलेल्या सर्व दुष्कृत्याची माहिती दिली. हा प्रकार कळतात शिक्षिकेच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तत्काळ पालक आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली. निष्पाप मुलींसोबत घडलेल्या भयानक कृत्यामुळे ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला.
१४ पीडित मुलींचे जबाब नोंदवले; आरोपीवर गुन्हे दाखल करून अटक
घटनेचे गांभीर्य ओळखून वाशीम ग्रामीण पोलिसांनी शाळेत धाव घेतली. आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले. पीडित मुली, त्यांचे पालक आणि इतर शिक्षक-शिक्षिकांकडून सखोल माहिती घेण्यात आली. पोलिसांनी सर्व १४ मुलींचे जबाब ‘इन कॅमेरा’ नोंदवले. या प्रकरणी आरोपी शिक्षक दिलीप बोरकर (वय ५६) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक संरक्षण कायद्याच्या (पोक्सो कायदा) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा कसून तपास करीत आहे. नराधम शिक्षकाच्या विकृत कृत्यामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा कलंक लागला. गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले. या नराधम शिक्षकावर कठोर शिक्षा करण्याची मागणी संतप्त पालकांनी केली आहे.
