नागपूर : फुटाळा तलावातील पाण्यातून गुंजणारे सप्तस्वर, पाण्याचा थुई-थुई नाच व रंगसंगतीमुळे तलावात निर्माण होणारा इंद्रधनुष्याचा भास आदीचा समावेश असलेल्या संगीत कारंजीने सी-२० साठी नागपुरात आलेल्या देश- विदेशातील प्रतिनिधींना भुरळ पाडली. फटाक्यांच्या आतषबाजीने येथील परिसर निनादून गेला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सी-20 परिषदेच्या आयोजन समितीचे संरक्षक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
कारंजीच्या माध्यमातून तयार झालेल्या पाण्याच्या पडद्यावर महानायक अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात नागपूरचा गौरवशाली इतिहास मांडण्यात आला. जगविख्यात संगीतकार ए.आर.रहेमान यांच्या संगीत संयोजनाने सजलेल्या या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित प्रतिनिधींनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.