नदीमने लावला सर्वात छोटय़ा पाणी फिल्टरचा शोध

सध्या घराघरात आरओच्या पाण्याचे आकर्षण आहे. या फिल्टरचे पाणी शंभर टक्के शुद्ध असते, असा सर्वाचा समज आहे.

आयएसओ, एनएबीएल व एमओईएफसीसीने दिले शुद्धतेचे प्रमाणपत्र

नागपूर : घराबाहेर  मिळणारे पिण्याचे पाणी शंभर टक्के शुद्ध असेल याची खात्री देता येत नाही. अनेकदा बाहेरचे पाणी पिऊन तहान भागवावी लागते. मात्र पाणी शुद्ध नसल्यास  आरोग्याच्या समस्यांनाही तोंड देण्याची वेळ येऊ शकते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन नागपूरचा युवा संशोधक नदीम खान याने सर्वाना परवडणारे आणि अशुद्ध पाणी झटकन शुद्ध करून ते पिण्यायोग्य करणारे छोटे खिशात मावेल अशा ‘ब्ल्यूमिनरल वॉटर फिल्टर’चा शोध लावला आहे. विशेष म्हणजे, याची विविध स्तरावर चाचणी झाली असून इंडियन स्टण्डर्ड असोसिएशनने याला प्रमाणित केले आहे.

सध्या घराघरात आरओच्या पाण्याचे आकर्षण आहे. या फिल्टरचे पाणी शंभर टक्के शुद्ध असते, असा सर्वाचा समज आहे. मात्र अनेक फिल्टर पाण्यात असलेले आवश्यक मिनरल्स काढून घेत आहेत. यावर उपाय म्हणून नागपूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त असलेल्या नदीम खानने  नसíगक पद्धतीने पाणी शुद्ध करणाऱ्या यंत्राचा शोध लावला असून त्याला ‘ब्ल्यूमिनरल’असे नाव दिले आहे. हे यंत्र तयार करण्यास केवळ दहा रुपये खर्च आला. या माध्यमातून जवळपास एक हजार लिटर शुद्ध पाणी मिळवता येऊ शकते, असा  नदीमचा दावा आहे. केवळ तीन इंचाचे हे  यंत्र असून याद्वारे पाण्यातील सर्व आवश्यक मिनरलस् मिळवता येतात, असेही नदीम सांगतो. चारकोल अ‍ॅक्टिव कार्बन, चांदीसह अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे यंत्र विकसित केले आहे.  सध्या ऑनलाईन बाजारात अग्रेसर असलेल्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावरही हे यंत्र उपलब्ध आहे.

आतापर्यंत १५ हजाराहून अधिक ब्ल्यूमिनरलची विक्री झाली असून बाजारात मागणी कायम आहे. ‘ब्ल्यूमिनरल’वॉटर फिल्टरला  इंडियन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन (आयएसओ), नॅशनल अ‍ॅक्रीडिटेशन बोर्ड ऑफ लेबॉरेटरी (एनएबीएल) आणि केंद्रीय पर्यावरण,वने व हवामान बदल मंत्रालय (एमओईएफसीसी) यांनी प्रमाणित केले आहे.

नक्षलग्रस्त भागातील जवानांसाठी फायद्याचे गोंदिया, गडचिरोलीचा भाग नक्षलग्रस्त आहे. येथे जवानांच्या तुकडय़ा चार-पाच दिवस जंगलात गस्तीवर असतात. नाईलाजाने त्यांना नदी-नाल्याचे अशुद्ध पाणी प्यावे लागते. परंतु नदीमने विकसित केलेले ‘ब्ल्यूमिनरल’ वापरून हे जवान शुद्ध पाणी मिळवू शकतात.

९० टक्के आजार हे दूषित पाणी पिल्यामुळे होतात. शाळा, महाविद्यालय किंवा प्रवासात चालता फिरता प्रत्येक वेळी फिल्टरचे पाणी मिळेलच याची शाश्वती नसते. ही बाब लक्षात घेऊन मी ‘ब्ल्यूमिनरल’वॉटर फिल्टर  विकसित केले.  – नदीम खान.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Water filter iso nbl mofcc akp