भंडारा : वैनगंगा नदी तीरावर वसलेले कारधा गाव. कधीकाळी गावासाठी उदरनिर्वाहाचे साधन असलेली वैनगंगा आज त्यांच्या जीवावर उठली आहे. एकीकडे गोसीखुर्द धरणात १०० टक्के जलसंचय झाल्याचा उदो उदो होत आहे तर दुसरीकडे गोसेखुर्द धरणातील आणि वैनगंगा नदीतील ‘बॅक वाटर’ म्हणजेच थोप, या भागात आहे.

कायम तुडुंब भरून राहत असलेल्या नदीमुळे गावातील घरांना ओल येऊ लागली. भिंती ओल्या, जमीन ओली, भिंतीला पाण्यामुळे जाणारे तडे ही स्थिती कायम असताना शासन आणि प्रशासन मात्र आश्वासनावर वर्षानुवर्षे यांची बोळवण करत आहे. वारंवार आंदोलन करून केवळ आश्वासनांशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही. पालकमंत्र्यांचेही आश्वासनच हवेत विरले. विशेष म्हणजे कारधावासी प्रकल्पग्रस्त की पूरग्रस्त हे सुद्धा शासन ठरू शकलेला नाही.

वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या जवळपास ३५८ घरांना कायमच पुराचा तडाखा बसतो. पूर नसला तरी वैनगंगा नदीच्या काठावर असल्याने गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरचा गावाला कायमच त्रास होत आहे. सातत्याने घराला ओल असल्याने पाऊस नसतानाही येथील भिंती गळत असतात. जमिनीवर ओल येत असल्याने खाली बसणे ही कठीण होऊन जाते. कोणत्याही क्षणी भिंत पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तर घरात पाणी शिरत असल्याने प्रचंड नुकसान होते.

गावातील अनु दिलीप पात्रे यांच्या घराच्या मागील भिंत अक्षरशः पाण्यात उभी असून दुभंगली आहे. तीन फूट पाण्यात उभे असलेली ही भिंत कुठल्याही क्षणी कोसळून जीवघेणी ठरू शकते. रात्री झोपताना सकाळी उठणार की नाही याची शाश्वती नसते अशी भीती अनु यांनी बोलून दाखवली. आठवडाभरापूर्वी जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी या ठिकाणी भेट दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले मात्र पुढे काय झाले हे त्यांना ठाऊक नाही.

अशा अत्यंत जीवघेण्या परिस्थितीत अनेक वर्षांपासून कारधावासी वास्तव्य करित आहेत. गावापासून चाळीस किलोमीटर अंतरावर गोसेखुर्द प्रकल्प असून नुकतीच या धरणाने पाणी पातळीचे उद्दिष्ट गाठत ऐतिहासिक नोंद केली आहे. एकीकडे स्वप्नपूर्ती झाली तर दुसरीकडे मात्र स्वप्नांची राख रांगोळी. कारण धरणात शंभर टक्के जलसंचय झाल्यामुळे गोसेखुर्द धरणातील आणि वैनगंगा नदीतील ‘बॅक वाटर’ कारधासह अनेक भागात शिरले आहे.

गोसीखुर्द प्रकल्प झाला आणि बॅकवॉटरचा फटका गावातील घरांना बसू लागला. कारधा गावाजवळच सुरक्षा भिंत असल्यमुळे पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. कायम तुडुंब भरून राहत असलेल्या नदीमुळे गावातील घरांना ओल येऊ लागली. जमीन ओली, भिंतीला पाण्यामुळे जाणारे तडे ही स्थिती कायम राहत असताना वर्षातून एक दोनदा येणारा पूर यात भर घालणारा असाच आहे.

३ वेळा महापुराचा तडाखा, पुनर्वसन अधांतरी

कारधा हे गाव २८ ऑगस्ट २०२० रोजी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात बाधित झाले होते. यामध्ये सुमारे ५००-६०० घरांचे नुकसान झाले. त्यानंतर १० आणि १५ ऑगस्ट २०२२ रोजी सलग दोनदा आलेल्या महापुरात १०० हून अधिक घरे पुन्हा पाण्यात गेली. घरांच्या भिंतींमध्ये ओलावा निर्माण होऊन साप-विंचवांसारखे प्राणी शिरले आहेत. नागरिक जीव मुठीत धरून येथे राहत आहेत.

आश्वासनांचे घोडे अडले कुठे…

गोसेखुर्द प्रकल्पाला ३८ वर्षांचा काळ लोटला. प्रकल्प उभा राहिला. प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या, पुनर्वसन, सिंचन आदींसाठी सरकारने शब्द दिला. मात्र, शेकडो प्रकल्पग्रस्तांचे आता हालच सुरू आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी होत असताना शासन आणि प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार प्रकल्पग्रस्त दर्जा मिळावा अशी कारधावास्यांची मागणी असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सतीश मारबते यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.