नागपूर : पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावासामुळे मध्य पूर्व आणि मध्य नागपुरातील विविध वस्त्यांमध्ये पाणी साचले आहेत. अनेकांच्या घरात पहाटे पाणी शिरल्याने लोकांना घराबाहेर काढण्यात आले.
वाठोडा, कळमना, नंदनवन झोपडपट्टी, वर्धमान नगर, जागन्नाथ बुधवारी, हंसापुरी मस्कासाथ या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. कळमना बाजारात पाणी शिरले. या भागातील नागनदी भरल्याने राहतेकरवाडी येथील झोपडपट्टीत पाणी शिरले. नंदनवन झोपडपट्टी परिसरातील राजेंद्र नगरमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोकांना घराबाहेर काढावे लागले असून त्यांची व्यवस्था जवळच असलेल्या महापालिका शाळांमध्ये करण्यात आली आहे.
वाठोडा परिसरात संजय नगरमध्ये एका घराची भिंत कोसळली, मात्र त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. नंदनवन, गणेश नगर, सक्करदरा, सुभेदार लेआउट या परिसरातील अनेक अपार्टमेंटमधील पार्किंगमध्ये पाणी साचल्याने लोकांना घराबाहेर पडता येत नाही. गुरुदेव देव व महेश नगर येथील अनेक अपार्टमेंटमध्ये पाहिल्या मजल्यापर्यंत पाणी आहे.