उन्हाळ्यात टंचाई सोसूनही पाण्याचे मोल कळेना!

धरणे भरताच शहरात पुन्हा पाण्याची बेमूर्वत नासाडी सुरू

(संग्रहित छायाचित्र)

अविष्कार देशमुख

सरलेल्या उन्हाळ्यात टंचाई सोसूनही नागपूरकरांना पाण्याचे मोल कळलेले दिसत नाही. पुढील दोन वर्षे शहराच्या पिण्याचा प्रश्न मिटला असे महापालिकेने जाहीर करताच  नागपूरकरांनी पुन्हा  पाण्याची बेमूर्वत नासाडी सुरू केली आहे.

गेल्या उन्हाळ्यात नागपूरकरांनी पहिल्यादा भीषण पाण्याची टंचाई अनुभवली. शहराला पाणीपुरवठा करणारे दोन्ही प्रमुख धरण तोतलाडोह आणि नवैगांव खैरी  कोरडे पडले होते. त्यामुळे महापालिकेवर एक दिवसआड मृतसाठय़ातून पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली होती. परिणामी, पाण्याचा  जपून वापर सुरू झाला होता. मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील चौराई धरण तुडुंब भरले आणि धरणाचे दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे तेथील पाणी थेट तोतलाहडोह धरणात आले आणि धरणाची पाणी पातळी वाढली. तोतलाडोह धरणात सरासरीपेक्षा जास्त जलसाठा निर्माण झाल्याने नागपूर शहरावरील जलसंकटाचे सावट टळले.

सध्या तोतलाडोह धरण ९९.८४ टक्के भरलेले असून उपयुक्तसाठा १०१५ लशलक्ष घनमीटर एवढा आहे. त्यामुळे सध्यातरी शहराला पाण्याची चिंता नाही. मात्र पुढे उन्हाळा आहे. उन्हाची तीव्रता बघता धरण कोरडे पडायला वेळ लागत नाही. शिवाय पाण्याची मागणी आणि वापरही दुप्पट असतो. तीव्र उन्हामुळे बाष्पीभवन देखील मोठय़ा प्रमाणात होते, त्यामुळे सध्या असलेले पाणी पुरेलच याची काहीच शाश्वती देता येत नाही. म्हणून उपलब्ध पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. मात्र शहरात तसे चित्र कुठेच दिसून येत नाही.

महापालिकेने दोन वर्षे पाणी पुरेल असे जाहीर करताच परत पाण्याची नासाडी सुरू झाली आहे. पिण्याचे पाणी सकाळ-सायंकाळ अंगणात शिंपडणे, दुचाकी चारचाकी वाहने नळाला पाईप लावून धुणे, झाडांना पाईपने पाणी टाकणे, असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे  महापालिका, ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स (ओसीडब्ल्यू) कडून जनजागृती अपेक्षित आहे. मात्र नेहमीप्रमाणे ते शांत बसले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water is not valued in nagpur abn

Next Story
साठवणुकीच्या अयोग्य पद्धतीमुळे राज्यात धान्याची नासाडी सुरूच
ताज्या बातम्या