नागपूर : नागपूरचा पारा चढू लागताच शहरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील सीमावर्ती भागात स्थिती चिंताजनक झाली आहे. विहिरीत पिण्यायोग्य पाणी नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून टँकरमुक्तीचा दावा करणाऱ्या महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी टँकरची मागणी वाढली असून फेऱ्यांची संख्याही दुप्पट झाली आहे. जलवाहिनी असलेल्या व नसलेल्या भागात सध्या ४०० हून अधिक टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत.
महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नळ जोडण्या नसलेल्या भागात दोनशेहून अधिक टँकर सुरू आहेत. मागच्या वर्षी या भागात २२० ते २३५ टँकर सुरू होते. जलवाहिन्या असलेल्या भागात ९० टँकर सुरू होते. शिवाय महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट हुडकेश्वर परिसरात ७६ टँकर सुरू होते. अशा स्थितीत या भागात टँकर बंद करणे तूर्तास शक्य नाही. या भागात जलवाहिन्याचे जाळे विणल्यानंतरच टँकर बंद करणे शक्य आहे. जलप्रदाय विभागाचे म्हणणे आहे की, पूर्वी एका टँकरद्वारे १० फेऱ्या केल्या जात होत्या. आता फक्त सात फेऱ्यांची परवानगी आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढलेली दिसत आहे. उन्हाळा तापू लागताच शहराच्या बाह्य भागात टँकरची मागणी वाढली आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढवण्यात आल्या आहे.
अनेक भागांत समस्या
शहरांतील अनेक भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. काही ठिकाणी तर दैनंदिन वापरासाठीही पाणी नाही, असा आरोप प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केला आहे. मागील काही महिन्यांपासून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, सुरुवातीची पंधरा मिनिटे गाळ व दूषित पाणी, ड्रेनेजची लाईन व पाणीपुरवठा करणारी लाईन हे एकाच ठिकाणावरून गेल्याने थोडा पाऊस पडला किंवा रोडवर पाणी आले की घाण पाणी नळाद्वारे येते. ऐन उन्हाळय़ात टँकरने केलेला अपुरा पाणीपुरवठा अशा समस्यांचा सामना समतानगर, कल्पना नगर, विश्राम नगर, सुगत नगर, कबीर नगर, अंगुलीमाल नगर येथील नागरिकांना करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाणीटंचाई नाही : ओसीडब्ल्यू
सद्यस्थितीत शहरात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात पाणी समस्या नाही. पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सिंचन विभागाने कळवले आहे, असे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी सांगितले.